पंतप्रधान आवास योजनेतील अडीच लाख घरकुलांचा ई-गृहप्रवेश सोहळा शुक्रवारी शिर्डीत होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने माणसे आणावी लागत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

शुक्रवारी शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अडीच लाख घरकुलांचा ई-गृहप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे यांनी या संदर्भातील कागदपत्रं ट्विट केली आहेत. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमास राज्यातील ५ जिल्ह्यांमधील एकूण २० हजार घरकुले लाभार्थी त्यांच्या कुटुंबीयांसह येतील. एकूण ४० हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतील. लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एकूण २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यात अल्पोपहारावर ५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे.

धनंजय मुंडे टीका करताना म्हणाले की, राज्य दुष्काळात होरपळत आहे. तिजोरीत खडखडाट आहे आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना मोदी यांच्या शिर्डीत होणा-या कार्यक्रमाला गर्दी जमा करण्यासाठी शासकीय तिजोरीतून २ कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने माणसे आणावी लागत आहेत. मोदींना खूष करण्यासाठी गर्दी जमवण्यात सामान्य जनतेच्या घामाचे कर रूपी जमा केलेले करोडो रुपयांचा चुराडा सरकार करत आहे. जनताच आता सरकारचा हिशेब करणार असल्याचे त्यांनी सांगितले.