राज्यातील विधानसभा निवडणुक ही भाजप आणि शिवसेनेतर्फे एकत्रित लढवण्यात आली. पण निवडणुकीच्या निकाला नंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे अखेर युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना  यांनी एकत्रित येत, सत्ता स्थापन केली. शिवसेना आणि भाजपमधील या सत्ता संघर्षामुळे दोन्ही पक्षांमध्ये एक अबोला निर्माण झाला. या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते कधी एकत्र येतील का अशी चर्चा, राजकीय वर्तुळात होती. पण अखेर देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषद पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्या निमित्ताने पुणे विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यात पुणे विमानतळावर 10 मिनिटे चर्चा झाली. मात्र नेमकी या दोन्ही नेत्यामध्ये काय चर्चा झाली याबाबतचा तपशील समजू शकला नाही.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.