बोईसर रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई

अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना बोईसर पोलिसांनी अटक केली.  यातील एक तरुण मुंबईहून अमली पदार्थ आणून बोईसरमध्ये विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

बोईसर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-१ जवळील रेल्वे वसाहतीजवळ दोन व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री १०.४५च्या सुमारास नीलेश सुर्वे(वय३०)बोईसर, संदीप लोधी(३२)पालघर यांना बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून  ४८० मिली ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले.  अधिक तपास केला असता आरोपींनी मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या महिलेकडून अमली पदार्थ विकत घेत असल्याची माहिती दिली.

नीलेश हा अंधेरीतून  अमली पदार्थ विकत आणीत होता. त्यानंतर लहान कागदात ते गुंडाळून विकत असे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हा बोईसरमधील ४० व्यक्तींना अमली पदार्थाची विक्री करत होता. त्याचा सुगावा लागल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे जरी कमी प्रमाणात असले तरी याचे मोठे जाळे मुंबई ते बोईसर दरम्यान असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अगदी नखाएवढय़ा आकाराच्या कागदात मावेल इतका अमली पदार्थ नीलेश भरून आणीत होता. ते तो प्रत्येकी १३० रुपयांना विकत होता. या टोळ्यांच्या मागे पालघर शहरातील काही बडय़ा व्यक्ती सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली. अमली पदार्थाच्या जाळ्यात तरुण वर्ग ओढला जात आहे, ही चिंतेची बाब आहे.