अवघ्या १५ दिवसाअगोदर धूमधडाक्यात टिळा, साखरपुडयाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर १४ मार्चला शुभमंगल ठरले. गावोगाव पाहुण्यांना पत्रिका पाठविल्या. लग्न चार दिवसांवर आले असताना नवरदेव पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कळमकोंडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलिसाचे नाव सोपान लिंबेकर असे आहे.

हगोली तालुक्यातील कळमकोंडा येथील रहिवासी असलेला सोपान गणेशराव लिंबेकर (वय २२) हा हिंगोली पोलीस दलात २०१२ मध्ये भरती झाला होता. हल्ली तो मुख्यालयात कार्यरत होता. त्याचा विवाह येडुद येथील एका युवतीशी निश्चित झाला होता. १५ दिवसांपूर्वी टिळा, साखरपुडय़ाचा कार्यक्रम मोठय़ा थाटात पार पडला. १४ मार्च रोजी लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते.

पोलीस विभागात कार्यरत असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता म्हणून सर्वाना लग्नाच्या निमंत्रण पत्रिकासुद्धा पाठविल्या होत्या. नव वधू-वराने लग्नाच्या निमित्ताने शुक्रवारी शहरात विविध दुकानांतून साहित्याची खरेदीसुद्धा केली होती. लग्नाला चार दिवस शिल्लक असताना सोपान लिंबेकर याने मात्र शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक अशोक मराळ आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद बासंबा पोलीस ठाण्यात करण्यात आली. सोपान लिंबेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी कळमकोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.