ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नेमणुकीस असलेला पोलीस कर्मचारी स्वतःला बरे वाटतनाही म्हणून १४ दिवसांच्या गृह विलगीकरणात असताना मुंब्र्याहून दुचाकीने सोलापुरात स्वगृही आला. नंतर त्याचा आजार वाढला असता वैद्यकीय तपासणीअंती त्याला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होताच प्रशासनाने करोनाबाधित पोलीस कर्मचारी राहात असलेल्या सोलापुरातील रविवार पेठेतील  संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संबंधित पोलीस कर्मचारी मूळचा सोलापूरचा असून तो ठाणे पोलीस दलात सेवेत आहे. मुंब्रा येथे कार्यरत असताना काही दिवसांपूर्वी त्यास थकवा जाणवू लागला असता त्याची मुंब्रा येथे वैद्यकीय तपासणी झाली होती. नंतर त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला होता.

दरम्यान, त्याने विलगीकरणात असताना दुचाकीने मुंब्रा येथून सुमारे ४०० किलोमीटर अंतर प्रवास करीत सोलापूर गाठले आणि थोड्याच दिवसांत त्याला आजारपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल व्हावे लागले. तेथे त्याची करोना चाचणी घेण्यात आली असता त्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सोलापुरात आतापर्यंत करोनाचे १३ रूग्ण आढळून आले आहेत. शासकीय रूग्णालयात अद्याप १६० रूग्णांचे करोना चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.