नांदेडपाठोपाठ आता हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक फुपाटे व इतरांनी उमेदवारांकडून किती रक्कम उकळली याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मराळ यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी गुण वाढवणाऱ्या २० कर्मचाऱ्यांना शनिवारी एसआरपीएफ’चे समादेशक योगेशकुमार यांनी निलंबित केले आहे.

नांदेड येथील पोलीस भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू असताना हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. लेखी परीक्षेत २० गुण वाढविल्याचे पुढे आले असून, एस.एस.जी. या सांगलीच्या कंपनीच्या ऑपरेटरनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन गुणवाढ केली असून, हिंगोलीत २० जणांची नियुक्ती केल्याची कबुली खुद्द आरोपी ऑपरेटर्सनी दिली आहे.

ज्या उमेदवारांना बोगस गुणवाढ देण्यात आली त्यामध्ये गोविंद ढाकणे, नीलेश अंभोरे, सुरेश चव्हाण, युसूफ फकीर, शेख मुनाफ फकीर, संदीप जुंबडे, उद्धव शिवराम धोत्रे, अमोल जावळे, हरिभाऊ दुघाळकर, विश्वनाथ दळवे, सतीश अंभोरे, सुभाष रिठाड, किसन शिंदे, गोरखनाथ कोकाटे, अमोल तांदळे, भगवान बोरुडे, रामकृष्ण वाघमारे, महादेव पवार, विठ्ठल खरात, विकास फुलचंद डोळे या उमेदवारांची गुणवाढीतून भरती झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

नांदेड येथील पोलीस भरती घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आल्याने एसएसजी कंपनीच्या ऑपरेटर्सनी हिंगोलीतही अशाच प्रकारचा घोटाळा केल्याचा प्रकार पुढे येताच हिंगोलीचे समादेशक योगेशकुमार व सहायक समादेशक तडवी यांनी चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले होते.

एस.एस.जी.कंपनीच्या लोकांना हाताशी धरून जयराम लोढाजी फुपाटे, नामदेव बाबुराव ढाकणे यांनी हा घोटाळा केला. १०० गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना येतील तेवढे प्रश्न सोडविले. उर्वरित बरोबर उत्तरांच्या पर्यायातला गोल करून कंपनीच्या लोकांनी गुण वाढवून दिले होते.

असे फुटले बिंग

विशेष म्हणजे उत्तरपत्रिकेत खालच्या बाजूने दुहेरी कार्बन होता. याबाबीचा संबंधित कर्मचाऱ्यांना विसर पडला. त्यामुळे या भरती घोटाळ्याचे बिंग फुटले. यामध्ये एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष बापुसाहेब ढाकणे, स्वप्नील दिलीप साळुंके, दिनेश गजभारे यांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये २०१३ साली ४, २०१४ साली १० तर २०१७ साली ६ जणांची अशा पद्धतीने निवड करण्यात आली होती. याबाबत पोलीस निरीक्षक पुरभाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त समादेशक जयराम लोढाजी फुपाटे, चालक नामदेव ढाकणे, ऑपरेटर शिरीष बापुसाहेब अवधुत, स्वप्नील दिलीप सोळंके, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा व २० उमेदवारांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मराळ यांनी दिली आहे.

सखोल तपास करू – चावरीया

येथील राज्य राखीव पोलीस दल भरती प्रकरणी सखोल तपास करण्यात येईल. यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने तपास केला जाईल. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक अरिवद चावरीया यांनी दिली आहे.