राज्य पोलीस दलाच्या संरचनेत १ जुलैपासून काही बदल होऊ घातले असून पोलीस ठाण्यांची चार श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. या नव्या संरचनेनंतर पोलिसांवर कामाचा ताण येऊ नये, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात लोकसंख्या, शहरीकरण परिणामी, वाहनांची संख्या नि गुन्हेगारी वाढली. मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढले नाही. पोलिसांवरील ताण वाढला आहे. एकापेक्षा जास्त पदांचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे साप्ताहिक सुटीला पोलीस पारखे झाले. थेट मानसिकतेवर आघात होऊ लागल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला व आत्महत्येसारख्या घटना घडू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मनुष्यबळ वाढविणे सुरू असले तरी केवळ त्यावरच न थांबता सरकारने पोलीस दलाच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. या बदलाचाच एक भाग म्हणजे पोलीस ठाण्यांचे श्रेणीकरण असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात सध्या एकूण १०७० पोलीस ठाणी असून त्यापैकी ‘क’ श्रेणीत सर्वाधिक म्हणजे ४६०, २५८ ‘ड’ श्रेणीत, ‘ब’ श्रेणीत २३४, तर ‘अ’ श्रेणीत ११८ पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरासरी घडणारे गुन्हे आणि सत्र न्यायालयात तुंबून असलेले खटले आदींचा विचार करून हे श्रेणीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यात बदल करण्याची गरज भासल्यास आयुक्त वा अधीक्षक दरवर्षी जानेवारीत अतिरिक्त पोलीस महासंचालकांना (कायदा व सुव्यवस्था) सुचवू शकतील. लगेचच मार्चमध्ये यावर अंतिम निर्णय त्यांना घ्यावा लागेल.
गुन्ह्य़ाचा तपास व न्यायालयीन कामकाज (पैरवी) अशा दोन यंत्रणा राहतील. अ ते क श्रेणी पोलीस ठाण्यातील तपास यंत्रणेत एक सहायक किंवा उपनिरीक्षक, एक सहायक उपनिरीक्षक किंवा एक हवालदार, एक नायक किंवा शिपाई, तर ड श्रेणी पोलीस ठाण्यातील तपास यंत्रणेत एक सहायक उपनिरीक्षक किंवा एक हवालदार, एक नायक किंवा शिपाई राहील. याशिवाय, अ श्रेणी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक महिला उपनिरीक्षक, हवालदार व शिपाई, ब श्रेणी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक महिला हवालदार व शिपाई, ड श्रेणी पोलीस ठाण्यात एका महिला शिपायाचा समावेश राहील. पैरवी यंत्रणेत अ श्रेणी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक किंवा हवालदार व तीन नायक किंवा शिपाई, ब श्रेणी पोलीस ठाण्यात एक सहायक उपनिरीक्षक किंवा हवालदार व दोन शिपाई, क श्रेणी पोलीस ठाण्यात एक सहायक उपनिरीक्षक किंवा हवालदार, ड श्रेणी पोलीस ठाण्यात एका शिपायाचा समावेश राहील.