नक्षलग्रस्त गडचिरोलीत पोलीसांचे मानसिक तणावात काम

नक्षलग्रस्त अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात राज्य राखीव पोलिस दलाचा जवान किरण कांबळे याने स्वत:च्या सव्‍‌र्हीस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या १७ जुलैला ताडगाव पोलिस मदत केंद्रात बी. हनुमंतू (४५) या जवानानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दीड महिन्यात दोन जवानांनी स्वत:वर गोळी झाडल्याने नक्षलग्रस्त गडचिरोलीत कर्तव्यावर असलेले पोलिस मानसिक तणावात काम करीत असल्याची बाब यातून समोर आली आहे.

गुरुवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास किरण कांबळे यांनी स्वत:च्या सव्‍‌र्हीस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्यांना अहेरी येथील रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले. या संदर्भात अहेरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता कांबळे यांना अहेरी येथे उपचारासाठी दाखल करून नागपूरला हलविल्याची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या कांबळे यांची प्रकृती ठीक आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक १० अ मध्ये कांबळे कार्यरत होते. अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात ते कर्तव्यावर होते. त्यांचा कुणाशी वाद नव्हता किंवा भांडणही झालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:वर अचानक गोळी का झाडून घेतली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून ते तणावात होते, अशीही माहिती आहे. मागील दीड महिन्यात नक्षलग्रस्त गडचिरोलीत दोन पोलिसांनी स्वत:वर गोळी झाडली आहे. १७ जुलैच्या सकाळी भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्रात कार्यरत बी. हनुमंतू या जवानाने दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून स्वत:वर गोळय़ा झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी अहेरीतील जवानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील पोलिस ठाण्यांमधील छावणीत वास्तव्यास असलेल्या राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियानासाठी दूरदूपर्यंत दिवसाला २० ते २५ किलोमीटर पायपीट करावी लागते. शिवाय सुटय़ा मिळत नसल्याने सहा महिने ते आपल्या गावाला जात नाही. त्यामुळे ते सतत तणावात असतात. कुटूंब मुलाबाळांपासून कायम दूर राहावे लागते. त्यामुळे हा मानसिक तणाव सातत्याने वाढत जातो. तसेच काही जण कायम तणावात काम करीत असतात. परिणामी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. या दोन घटनाच नाही तर यापूर्वीही जिल्हय़ात पोलिस ठाणे तसेच दुर्गम भागातील पोलिस मदत केंद्रात पोलिस शिपायांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किरण कांबळे यांनीही मानसिक तणावातूनच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.