खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुहीचे राजकारण चव्हाटय़ावर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्या प्रचारानिमित्त उद्या मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. तर, गुरुवारी (दि. ३) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची ही गटबाजी लोकसभेच्या निमित्ताने अधिक गडद झाल्याखेरीज राहणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
विधानसभेची रंगीत तालीम ठरणा-यासातारा लोकसभा मतदार काँग्रेस आघाडीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना बिनशर्त पाठिंबा देऊन आपल्या विभागातून मताधिक्याची ग्वाही दिली आहे. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या ६ मतदारसंघांत कराड दक्षिणमधून विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. उर्वरित पाचही मतदारसंघांवर राष्ट्रवादीची वर्चस्व असून, कराड दक्षिणमध्येच उंडाळकर गटाविरुद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक असे नेहमीचे चित्र पुन्हा उभे आहे. खरेतर लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा जिल्ह्याच्या ठिकाणी होणे क्रमप्राप्त असताना मुख्यमंत्र्यांच्या घरच्या मैदानावरच गटबाजीचे राजकारण दाटून आहे. काँग्रेसचे सर्वच नेते व कार्यकर्ते उदयनराजेंच्या पाठीशी असतानाही स्वतंत्र मेळावे, बैठका आणि या पाश्र्वभूमीवर विशद होणारी वेगवेगळी वक्तव्ये किमान मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीला अशोभनीय असल्याचा शेरा सुज्ञ मतदारांकडून नोंदवला जात आहे.