सांगली बंदमागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याची शंका राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यास पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. याच वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे.

“शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्याच्यासाठी बंद करणे. हे जरा चुकीचे वाटत. यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली येथे जात असून त्याच दिवशी बंदची हाक देणं योग्य नसल्याचेही सुळे यांनी सांगितले.  “संजय राऊत यांनी काल त्यांचे शब्द मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा – उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही – संभाजी भिडे

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी टीका करण्याचा अधिकार आहे असं सुळे म्हणाल्या. “आमचं दडपशाहीच सरकार नाही. हाच फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मनमोकळ्या मनाने टीका करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करत राहू. त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी,” अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.