कारखान्यातून सांडपाणी सोडल्याचा आरोप

मनोरनजीक असलेल्या कोंढाण गावातील विहिरींचे पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या परिसरातील असलेल्या एका कारखान्यातून सांडपाणी सोडल्यामुळे विहिरींचे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोंढाण गावातील ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाणी काळे झाले असून त्यावर फेसही येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावाच्या पूर्वेला होमिओपॅथिक औषधे तयार करणारा कारखाना अनेक वर्षांपासून आहे. या कारखान्याच्या कुंपणात नैसर्गिक नाला आहे. कारखान्यातून नाल्यामध्ये फेसयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. या नाल्याचे प्रदूषित पाणी जमिनीत मुरले जात असल्याने विहिरीचे पाणी प्रदूषित झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विहिरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कारखान्यात होमिओपॅथिक औषधे तयार केली जातात. कारखाना प्रदूषणविरहित आहे. ग्रीन कॅटेगरीमध्ये तो मोडत असून सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही.   – महेंद्र जैन, मालक, बायोफोर्स कंपनी.

विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पाणी तपासणी अहवाल मिळाल्यानंतर कारवाई अपेक्षित आहे. – अंकुश पडवले, सरपंच, ग्रामपंचायत कोंढाण.