डाळिंब उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा डाळिंबाचे भरघोस उत्पादन झाले असताना दुसरीकडे मालाचे दर कोसळल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सोलापुरातील उत्कृष्ट प्रतीच्या डाळिंबाला नवी दिल्लीच्या बाजारपेठेवर अवलंबीन राहावे लागते. परंतु अलीकडे दिल्लीत वाढलेल्या धुक्यासह एकूणच प्रदूषणामुळे तेथे डाळिंब पोहोचणे कठीण झाले आहे. त्यातच तेल्या रोगाचाही प्रादूर्भाव वाढल्याने डाळिंबाच्या दराची घसरण झाल्याचे सांगितले जाते.

सोलापूर जिल्ह्य़ात सांगोल्याचे डाळिंब जगात प्रसिद्ध आहेत. एकेकाळी दुष्काळग्रस्त व कोरडवाहू सांगोल्यात शासनाने फलोत्पदानाला चालना दिल्यामुळे या भागात डाळिंब उत्पादन वाढले आहे. त्या खालोखाल पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्ह्य़ातील एकूण डाळिंबाचे क्षेत्र सुमारे ५४ हजार एकर असून त्यापैकी सुमारे २० हजार एकर क्षेत्र सांगोल्यातील आहे. येथील भगवा व गणेश जातीच्या डाळिंबाला देशासह परदेशातही मागणी आहे. नवी दिल्लीसह राजस्थानातील बाजारपेठेतही येथील डाळिंब पाठविला जातो.

यंदा जिल्ह्य़ात पावसाळ्यात सांगोल्यासह सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने साहजिकच डाळिंबाचे उत्पादनही वाढले आहे. परंतु त्याचवेळी योग्य निगा न राखल्यामुळे डाळिंबाच्या बागांमध्ये तेल्या रोगाने घुसखोरी केल्याने अव्वल दर्जाचे व उत्कृष्ट प्रतवारीचे डाळिंब उत्पादन घटले आहे. बहुसंख्य डाळिंब दुय्यम व तिय्यम दर्जाचे उपलब्ध झाले असून त्याचा फटका दराला बसला आहे. यातच नवी दिल्लीकडे  नियमितपणे जाणाऱ्या डाळिंबाची निर्यात तेथील धुके व प्रदूषणामुळे जवळपास थांबली आहे. त्याचाही फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. नवी दिल्लीत सांगोला, मंगळवेढा व पंढरपूरच्या डाळिंबाला एरव्ही प्रतिकिलो शंभर रुपयांपेक्षा जास्त भाव मिळतो. यात पुन्हा अव्वल दर्जाचे डाळिंब कमी प्रमाणात व तेल्या रोगाने ग्रस्त डाळिंब प्रचंड प्रमाणात असल्याने एकूण बाजारपेठेत मालाचे दर कोसळले आहेत. सांगोल्यातील प्रकाश लवटे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा डाळिंब माल नियमितपणे नवी दिल्लीत जातो. तेथील व्यापारी सांगोल्यात येऊन डाळिंब खरेदी करतात. त्यात चार पैसे जास्त मिळतात. परंतु अलीकडे नवी दिल्लीसाठी डाळिंबाची वाहतूक जवळपास थांबली किवा बऱ्याच अंशी रोडावली आहे. त्यामुळे डाळिंबाला मिळणाऱ्या दराची खात्री संपुष्टात आली आहे. तर दुसरीकडे गुजरातेतूनही डाळिंबाचे उत्पादन वाढल्याने त्याचाही परिणाम सोलापूरच्या डाळिंब दरावर झाला आहे.

राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीकडे मध्यम व कमी प्रतीचे डाळिंब येत असून मागील आठवडय़ात १२ लाख १२ हजार ५६३ किलो डाळिंबाची आवक झाली. यात प्रति १० किलोमागे कमाल ८०० रुपये व सर्वसाधारण २३० रुपये एवढाच दर मिळाला. मागील वर्षांत याच महिन्यात सोलापूरच्या या कृषी बाजारात ३१ लाख ८९ हजार किलो डाळिंबाची आवक होऊन त्यात कमाल दर १४०० रुपये व सर्वसाधारण दर ३०० रुपये इतका मिळाला होता. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा डाळिंबाचे दर घसरल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. सोलापुरात स्थानिक डाळिंबासह पुणे, नगर, नाशिक, सांगली, लातूर, बीड आदी भागातून डाळिंबाची आयात होते. तर सोलापुरात खरेदी केलेल्या डाळिंबाची निर्यात दक्षिणेकडे आंध्र, तेलगंणा, तामिळनाडूसह कोलकाता, ओरिसा आदी दूर दूरच्या भागात होते.

सांगोल्याच्या बाजारपेठेतही डाळिंबाचे दर घसरले आहेत. किरकोळ दर प्रतिकिलो २० रुपये ते ३० रुपयांपर्यंत आहेत. सांगोला शेती बाजारात सध्या दररोज सुमारे दोन लाख किलो डाळिंब विक्रीसाठी येत असताना त्याचा दर मात्र प्रति किलो १० रुपये ते ५० रुपये इतकाच मिळत आहे.