कर्जमाफी योजनेसाठी पुढील महिन्यात पोर्टल तर मार्चमध्ये पात्रता यादी

नगर: राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या म. ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र-अपात्र थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या याद्या गावनिहाय, सेवा संस्थानिहाय मार्चच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाणार आहेत. त्यासाठी वापरल्या जाणार असलेल्या पोर्टलची निर्मिती पेब्रुवारीमध्ये केली जाणार आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी २ लाखांपर्यंतचे थकबाकीसह कर्ज असणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक टप्प्यात २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतक ऱ्यांची जिल्हा बँकेकडील संख्या १२ हजार १२९ असल्याने ते शेतकरी अपात्र ठरले आहेत.

कर्जमाफी योजनेच्या निकषांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी आज, बुधवारी दिली. त्यातून पहिल्या टप्प्यातच जिल्ह्य़ातील १२ हजारांवर शेतकरी अपात्र ठरले गेल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांकडील आकडेवारी स्पष्ट झाली नाही. सध्या जिल्हा बँकेकडील पीक कर्ज घेतलेल्या व पुर्नगठण केलेल्या शेतक ऱ्यांची संख्या २ लाख ५८ हजार ७५५ आहे तर त्यांच्याकडील कर्जाची रक्कम १ हजार ७९९ कोटी रुपये आहे.

योजना आधार सलग्न असल्याने शेतक ऱ्यांनी आपले बँक खाते आधार सलग्न आहे का, याची खात्री करावी, आधार क्रमांकाचीही खात्री करावी, असे आवाहन द्विवेदी व आहेर यांनी केले. कर्जमाफीची रक्कम मान्य की अमान्य याचीही माहिती शेतक ऱ्यांना पोर्टलवर कळवावी लागणार आहे.  हे पोर्टल फेब्रुवारीमध्ये कार्यान्वित होणार आहे तर पात्र-अपात्र शेतकऱ्यांची यादी मार्चमध्ये जाहीर केली जाणार आहे. मेपर्यंत ही योजना पूर्ण करायची आहे. दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज, कर्जाचे पुनर्गठण केलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीसह २ लाखांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळणार आहे. परंतु या योजनेत कुटुंबाऐवजी वैयक्तिक लाभार्थी घटक धरून कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीसाठी अर्ज करावा लागणार नाही व कर्जमाफीची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. या वेळी आहेर यांनी योजनेतील निकषांची माहिती दिली.

योजनेसाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. अपात्र ठरवल्या गेलेल्या लाभार्थीची माहिती या समितीकडे जाणार आहे, तसेच कर्जमाफीची रक्कम ज्यांनी अमान्य म्हणून नोंदवली, त्यांची नावेही या समितीकडे पडताळणीसाठी येणार आहेत. सेवा सोसायटय़ा, बँका यांच्याकडून लाभार्थीची यादी तयार करण्यासाठी सहकार विभागाने जिल्ह्य़ात ७० लेखापरीक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी दिली.