|| महेश बोकडे

विदर्भातील चार महाविद्यालयांचा समावे

‘बाल कुपोषण व शारीरिक स्थूलपणा’ ही गंभीर समस्या आहे. शासनाने या विषयातील तज्ज्ञ वाढवण्यासाठी राज्यातील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशियन) या विषयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम २०१८- १९ पासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, यात चार महाविद्यालये विदर्भातील आहेत.

राज्यातील अनेक मागास व आदिवासीबहुल भागात आजही लहान मुलांमधील कुपोषण ही गंभीर समस्या कायम आहे. अनेक शहरी भागातही कुपोषणग्रस्त मुले आढळतात. शासनाने कुपोषण नियंत्रणासाठी सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यातील १५ जिल्ह्य़ांमध्ये पोषण पुनर्वसन केंद्र सुरू केले आहेत, परंतु आजही कुपोषित बालकांची संख्या अपेक्षेनुसार कमी झाली नाही.

दरम्यान, राज्यातील सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये बदलती जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवयींसह इतर कारणांमुळे लठ्ठपणासह इतरही आजार वाढत आहेत. या आजारावर नियंत्रणासाठी राज्यात मोठय़ा प्रमाणात पोषण आहाराशी संबंधित तज्ज्ञांची गरज भासणार आहे.

ही गरज लक्षात घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने, (नाशिक) शासनाला राज्यात मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशियन) हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्तावित केले  होते. त्यावरून शासनाने औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, पुणे, नांदेड, अकोला, यवतमाळ या सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील गोंदिया व चंद्रपूर ही दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नवीन आहेत. त्यामुळे येथे प्रथमच पदव्युत्तरचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. हा अभ्यासक्रम एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बी. एससी., बी. एसी. नर्सिगमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी युनिसेफची शासनाला मदत मिळणार आहे.

‘‘शासनाने कुपोषण आणि स्थूलपणा हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यानुसार  राज्यातील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशियन) हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे भविष्यात या विषयातील तज्ज्ञ राज्याला उपलब्ध होतील.’’  – डॉ. मनीष श्रीगिरीवार, अधिष्ठाता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.