गोपीनाथगडावर शक्तिप्रदर्शनाची शक्यता :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराबाबतचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही मंगळवारी दोन दिवसांपासून ठेवलेले मौन सोडत पक्षांतराच्या वृत्तामुळे आपण व्यथित असल्याचे सांगितले.

मंगळवारी माजी मंत्री बबनराव लोणीकर, विनोद तावडे, राम शिंदे यांच्यासह पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पंकजा यांची भेट घेतली. पंकजा यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी मागणी पुढे येत असून त्याला लोणीकर यांनीही पुष्ठी दिली. आता गोपीनाथगडावर १२ डिसेंबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. त्यात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली होती. त्यातून पंकजा मुंडे या नाराज असून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चेलाही हवा मिळू लागली. त्यामुळे पंकजा यांच्या कथित पक्षांतराच्या चच्रेनेच भाजप नेत्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन पक्षांतराचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले, तर पंकजा यांनीही आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्याला पदापासून वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक अशी चर्चा केली जात असल्याचा खुलासा देताना आपण पक्षांतराच्या चर्चेने व्यथित झालो असल्याचे सांगितले.

दरम्यान, माजी मंत्री बबनराव लोणीकर, विनोद तावडे, राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा या नाराज नसून गोपीनाथगडावरील कार्यक्रमाच्या तयारीसाठी भेट घेतल्याचे नेते सांगत असले तरी पक्षांतर्गतची चलबिचल लपून राहिली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना रसद पुरवली असून माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच मिळू दिली नसल्याचा आरोप उघडपणे केला जातो. या पाश्र्वभूमीवर १२ डिसेंबर रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाला भाजप अंतर्गत नाराज नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षांतर चर्चेला पूर्णविराम

कथित पक्षांतराच्या चर्चेनंतर पंकजा मुंडे यांनी मंगळवारी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मजकुरासोबत भाजप पक्षचिन्ह कमळाचे चित्र त्यांच्या समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले. यातून पक्षांतराच्या चच्रेला यामुळे पूर्णविराम मिळेल का? हे मात्र १२ डिसेंबर नंतरच कळणार आहे. मी पक्ष सोडणार नाही.  बंडखोरी माझ्या रक्तात नाही.

-पंकजा मुंडे, भाजप नेत्या