महाआघाडीत जे पक्ष आले नाही ती भाजपाची बी टीम आहे असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता टीका केली. काही पक्षांना आम्ही देशहितासाठी, संविधान वाचवण्यासाठी महाआघाडीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करत होतो. पण काहीतरी कारणं देऊन महाआघाडी होऊ नये म्हणून भाजपाची बी टीम कार्यरत होती असाही टोला त्यांनी लगावला.

जातीयवादी भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही विचार केला त्यानुसार आम्ही मित्रपक्षांना सामावून घेतले आहे. ४८ जागी भाजप- सेनेचे उमेदवार जाहीर होतील. परंतु त्यामध्ये २५ टक्के जागी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारातील लोकांना उमेदवारी दिली आहे असा टोला लगावला. चांगल्या लोकांच्या मागे विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावायचा असे धोरण भाजप सरकारने राबवायला सुरुवात केली आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.

मतांचे विभाजन होवू नये म्हणून शेकापने ५२ वर्षानंतर एकही जागा मागितली नाही. जागेपेक्षा संविधान जपणे महत्त्वाचे आहे यासाठी सर्वांनी कामाला लागावे. यासाठी निवडणूक कामाला लागले पाहिजे. त्यामुळे या महाआघाडीला साथ द्यावी असे आवाहन शेकापचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केले.

या राज्यात जाती-जाती धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यात आली आहे. एक एकाचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. संविधान धोक्यात आले आहे. महत्वाच्या संस्था सुद्धा धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा नेता म्हणून तणनाशक औषध फवारणी करून कमळाचे हे पीक नष्ट करायचे आहे अशी टीका राजू शेट्टींनी केली.