प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला आहे, मात्र त्यातून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लागली आहे, संघर्ष निर्माण होणार आहे, असे मत बहुचन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मंडल आयोगाने ज्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर ओबीसींना आरक्षण दिले, तेच मराठा समाजाला लागू केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये आमच्या ताटात वाटेकरी निर्माण झाल्याची, भीतीची भावना निर्माण झाली आहे. त्यातून शांत असलेला महाराष्ट्र आता संघर्षांच्या उंबरठय़ावर उभा राहिलेला दिसेल, आरक्षणातून निर्माण झालेली ही कटुता निवडणुकीतून बाहेर पडलेली दिसेल, असेही त्यांनी पुढे म्हटले.

नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदे’साठी अ‍ॅड. आंबेडकर आज, शुक्रवारी येथे आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजासाठी स्थापन केलेला गायकवाड समितीचा अहवाल सरकारने जाहीर करायला हवा, त्यातून श्रीमंत मराठा किती व गरीब मराठा किती याची टक्केवारी स्पष्ट होईल, लोकशाहीत कोणताही अहवाल गोपनीय नसतो, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही, याबद्दल आपण साशंक आहोत, असे सांगून आंबेडकर म्हणाले की, केंद्रात व राज्यात दोन्हीकडे भाजप सरकार आहे, त्यामुळे राज्यात ७० टक्के आरक्षण लागू केल्यास मराठा समाजाचे आरक्षण टिकेल, असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना दिला होता, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही.

मराठा समाजानेही आपले आरक्षण १६ टक्क्य़ांच्या मर्यादेत राहील, याकडे लक्ष द्यावे, २७ टक्क्य़ांमध्ये अडकू नये, परंतु दुर्दैवाने मराठा समाजातील नेत्यांमध्ये तेवढे समजून सांगण्याची हिंमत नाही, दोन ताटे वगळी ठेवण्याची भूमिका मराठा नेते घेत नाहीत तोपर्यंत न्यायालयात याचिका दाखल होत राहतील, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

भीमा-कोरेगावला जाणार

यंदा दि. १ जानेवारीला आपण भीमा-कोरेगावला अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत, सरकारने सर्वसामान्यांचा विरोध पत्कारू नये अशी भूमिका अ‍ॅड. आंबेडकर यांनी मांडली. समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांनी नगरमध्येच बोलताना प्रकाश आंबेडकर हे नक्षलवादी असल्याचा आरोप केला होता, त्याकडे लक्ष वेधले असता आंबेडकर म्हणाले, की संवेदनशील विषयावर बिनडोक माणसाने काही बोलू नये, असे म्हणतात परंतु ते (कांबळे) तेथे कधी गेले होते का? त्यांना जसे भुंकायला सांगितले तसे ते भुंकतात.

राफेलबाबत काँग्रेसचा बोटचेपेपणा

राफेल विमान घोटाळ्याबाबत राहुल गांधी हे भूमिका मांडताना दिसतात, त्यातून काँग्रेस बोटचेपेपणा करताना दिसत आहेत, राहुल यांच्याऐवजी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग किंवा माजी संरक्षणमंत्री ए. के. अँथनी हे अधिक स्पष्टपणे भूमिका मांडू शकतील व मोदींच्या चुका दाखवू शकतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

संविधानावरील संकट टळले

तीन राज्यांच्या निवडणूक निकालामुळे संविधानावरील संकट टळले गेले आहे, परंतु भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांत एकमेकांना ब्लॅकमेल करणे सुरू झाले आहे. पंतप्रधान पदाची इच्छा असलेले सर्व ‘आत्मे’ही जिवंत झाले आहेत, त्यामुळे महाआघाडी राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. समाजवादी व बहुजन समाज पक्ष यांच्यात युती झाली, तर भाजपच्या जागा १०० पर्यंत राहतील अन्यथा ते २०० पर्यंत जातील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.