आंबेडकर म्हणतात, २३ फेब्रुवारीला भूमिका जाहीर करू

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेसमध्ये महाआघाडी होण्याच्या निर्णयाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ फेब्रुवारीला भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. या अगोदरही त्यांनी काँग्रेसला वेळ देऊन निर्णय न घेतल्यास भूमिका जाहीर करू, असे सांगितले होते. त्यामुळे २३ फेब्रुवारीला ठोस निर्णय जाहीर होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूने शेवटपर्यंत ताणून धरण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप व शिवसेनेची युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जाहीर होऊन जागा वाटपही झाले. राज्यातील लहान पक्ष मात्र अद्यापही अधांतरी आहेत. भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवीन प्रयोग करीत आहेत. त्यांनी अनेक मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवारही जाहीर केले. दुसरीकडे त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा पर्यायही खुला ठेवला. मात्र, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांमधील बोलणी पुढे सरकत नसल्याची स्थिती आहे. भविष्यात सत्तेत आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणा व वंचित आघाडीचे उमेदवार जाहीर केलेले मतदारसंघ सोडा, अशी अ‍ॅड. आंबेडकर यांची काँग्रेसकडे मागणी आहे.  काँग्रेस अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोल्याची जागा सोडण्यास तयार आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांनीही सावध पवित्रा घेत अद्यापपर्यंत वंचित आघाडीचा उमेदवार अकोला मतदारसंघात जाहीर केला नाही. अकोला हा आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. अकोल्यात ऐनवेळी उमेदवार जाहीर करू, असे आंबेडकर यांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद नाही. केवळ प्रसारमाध्यमांमध्येच ते बोलत आहेत. आमची भूमिका २३ फेब्रुवारीला जाहीर करू.

– अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे काँग्रेसचे पूर्ण प्रयत्न आहेत. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चाही केली. मात्र, योग्य प्रतिसादाअभावी निर्णय झाला नाही.

– माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस