मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात मराठा आरक्षण हा मुख्यत्वे ठाकरे सरकारचा विषय आहे. यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे. असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपूरच्या महापुरानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?
“मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मदत करावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहे, मात्र मदत मिळाली पाहिजे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा विषय दोन्ही छत्रपतींनी केंद्र सरकारकडून सोडवून घ्यावा असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. याबाबत भाष्य करण्याचे मात्र संभाजीराजेंनी टाळले.