राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली असून सर्वच आघाडय़ांवर राज्याची प्रगती सुरू आहे. मात्र विरोधकांकडून हेतुपुरस्सर गैरसमज पसरवला जात आहे. मात्र ‘एकदा’ अनुभव घेतल्यामुळेच राज्यातील जनतेने पुन्हा युतीकडे वळून पहिलेले नसून, गेली १५ वर्षे आघाडीवर विश्वास टाकला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचे आव्हानही आम्हीच जिंकू, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विरोधकांना हाणला.
विरोधी पक्षांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या गेल्या १४ वर्षांतील कारभाराचा लेखा-जोखा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात नवीन काहीच नसल्याचे मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे ‘ही मामा जत्री गेला, काळी कुत्री घेऊन आला’ असे असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असूनही येथील प्रश्नांवर सभागृहात फारशी चर्चा झाली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, दरडोई उत्पन्न, सकल घरेलू उत्पन्न, आर्थिक विकास दर, बालमृत्यू रोखणे अशा सर्वच क्षेत्रांत राज्याने प्रगती केली आहे. राज्याची अर्थव्यवस्थाही मजबूत असून ज्याची आर्थिक क्षमता असते तोच कर्ज काढतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारण्यास सरकार कटिबद्ध असून युतीने त्यांच्या कार्यकालात स्मारके उभारण्याचा निर्णय घेण्याचेही धाडसही दाखविले नाही, असे ते म्हणाले.
मानीव अभिहस्तांतरण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेला ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. राज्यातील दंगलीत ५० टक्क्यांची घट झाली असून नक्षलवादावर नियंत्रण मिळविण्यातही सरकारला यश येत आहे. मुंबईत सीसीटीव्ही बसविण्यासाठी आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्या असून त्याबाबतचा निर्णय लवकर होईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य माहिती आयोग, महिला आयोगावरील अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्या तरी कामकाजावर कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा करताना भ्रष्टाचारी मंत्र्याबाबत मात्र कोणतेही भाष्य करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले.