रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून मोठय़ा प्रमाणात रसायनयुक्त दूषित सांडपाणी कुंडलिका नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. औद्योगिक वसाहतीतच हे प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र आहे. असे असताना औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी कुंडलिका नदीत येते कसे. असा प्रश्न समोर येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना प्रदूषण मंडळ, पर्यावरणवादी गेले कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
कुंडलिका नदीत सांडपाणी बायपास केले जात असल्याची कित्येक वर्षांची रोहेकरांची तक्रार आहे. जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रणा कशासाठी आहे. जे कारखानदार आपल्या सोयीसाठी कारखान्यातील सांडपाणी कुंडलिका नदीकडे जाणाऱ्या नाल्यामध्ये सोडतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न पुढे आले आहेत. येथील जलशुद्धीकरण केंद्रालाही मर्यादा आहेत. ठरावीक मर्यादेपुढे ते कुचकामी ठरत असल्याचे कित्येक वेळा दिसून आले आहे. ही यंत्रणा केवळ नावापुरती असून तिचे काम सदस्य कारखान्यांतून बिले जमा करण्यापुरतेच मर्यादित राहिले असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस नीलेश पोकळे यांनी केला आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे उत्तर दिले पाहिजे. परंतु या साऱ्या गोष्टी घडत असताना या दोन्ही विभागांची भूमिका संदिग्ध असल्याचे दिसून येत आहे.
  रोह्य़ाची जीवनवाहिनी म्हणून परिचित असलेल्या कुंडलिका नदीची शुद्धता आणि पवित्रता धोक्यात आली असून, संपूर्ण नदीच्या पात्रात पाणी ठिकठिकाणी प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे जे पाणी दैनंदिन जीवनात नागरिकांना वापरण्यासाठी उपयुक्त होते, तेच पाणी दूषित झाल्याने पाण्याचा वापर बंद झालेला आहे. परिणामी माशांची पदास घटल्याने मच्छीमारांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत राज्य शासन आणि प्रदूषण मंडळाची उदासीन भूमिका दिसून येत आहे.
  धाटाव औद्योगिक कारखान्यातील दूषित सांडपाणी लगतच्या ग्रामपंचायती व रोहा नगरपालिकेचे सांडपाणी सानेगाव येथील नदीकिनारी जेट्टीत उतरणाऱ्या दगडी कोळसा आदींमुळे कुंडलिका नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. नदीला वाचविण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांची मोठी किंमत रोहा आणि परिसरातील लोकांना मोजावी लागेल, असा दावा तज्ज्ञ मंडळी करीत आहेत.
 पूर्वी पाणीटंचाई भासली की या नदीच्या पात्रातील पाण्याचा वापर नागरिक दैनंदिन वापरासाठी करीत असत. आज तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवत असताना या नदीचा चांगला उपयोग येथील जनतेला झाला असता, परंतु प्रदूषणामुळे नदीच्या पात्रातील पाणी योग्य नसल्याचे सातत्याने पुढे आले आहे.
 प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाण्याचा दैनंदिन वापर बंद, जनावरांचे पाण्यासाठी हाल, मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न अशा समस्या निर्माण झाल्या असून यावर उपाययोजना करण्याची िनतात गरज आहे. कुंडलिका नदी वाचली तर भविष्यात पाण्याची समस्या तालुक्याला भेडसावणार नाही.