तालुक्याबाहेरील नागरिकांना विरोध

पालघर : जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाला  सोमवारपासून सुरुवात झाली असता या ठिकाणी  तालुक्याबाहेरील  नागरिकांना स्थानिकांनी  विरोध करत  केंद्रावर गोंधळ घातला. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया  स्थगित करण्यात आली.

जव्हारच्या पतंगशाह कुटीर उपजिल्हा रुग्णालयात सोमवार २०० ते २५०० नागरिकांसाठी लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याकरिता सकाळपासून मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच दादरा नगर हवेली भागातून ५० पेक्षा अधिक गाडय़ा आल्या होत्या. त्यांना  स्थानिकांनी रोखले.  पालघर जिल्ह्यतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, वाडा या दुर्गम व आदिवसी भागात अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने १८ ते २४ वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाइन (रजिस्ट्रेशन) नोंदणी करणे अशक्य बाब असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यतील ग्रामीण भागासाठी वॉक-इन पद्धतीने लसीकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी केली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी लसीकरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी या विषयी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.