औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर येत्या ३ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, प्रचाराचे तंत्र सोशल मीडियाच असेल असे भाजप सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी बुधवारी सांगितले. भाजपच्या प्रचाराचे तंत्र ओळखून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनीही प्रचारात सोशल मीडियाला स्थान देण्यास सुरुवात केली आहे. विभागीय बठकीत प्रचाराची तयारी करण्यासाठी मराठवाडय़ातील कार्यकर्त्यांची बठक घेण्यात आली. बठकीस लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड, संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती.
नामनिर्देशन पत्र घेऊन जाण्यास उमेदवारांनी प्रारंभ केला असून, काही सारख्या नावाच्या व्यक्तींनी अर्ज नेले आहेत. दरम्यान, प्रचार यंत्रणा कशी लावायची, असा प्रश्न भाजपसमोर होता. प्रचारासाठी हाती कमी कालावधी असल्याने उमेदवार शिरीष बोराळकर यांची दमछाक होईल, असे मानले जात आहे. कमी कालवधीत मतदापर्यंत संपर्क करणेही अवघड असल्याने सोशल मीडियाचा भाजपकडून अधिक उपयोग होईल. तथापि सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे सतीश चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बूथनिहाय व्यवस्था लावण्यात आली होती. त्याचा लाभ होईल, असा दावा सुजितसिंह ठाकूर यांनी केला. उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यानंतर बोराळकर यांनी विभागीय प्रचार कार्यालय सुरू केले. मतदारयाद्यांची तपासणी करुन दूरध्वनीवरुन संपर्क व्यवस्था लावण्यात आल्याचे सांगितले जाते. या निवडणुकीत विजयाचा दावा करीत भाजपचे सरचिटणीस ठाकूर यांनी प्रचार यंत्रणेचा बुधवारी आढावा घेतला.