रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा गेले काही दिवस सातत्याने शंभराच्या आत राहिला असून गेल्या शुक्रवारी सुमारे महिनाभरातील नीचांकी नोंद झाली.

गेल्या रविवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये नवीन ८५ करोनाबाधित रूग्ण सापडले असून हाच आकडा शनिवारी ६४, तर शुक्रवारी ४४ राहिला होता. बाधितांमध्ये रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यातील रुग्ण नेहमीच सर्वाधिक राहिले आहेत. रविवारी निष्पन्न झालेल्या ८५ रुग्णांपैकी तब्बल ५५ रूग्ण याच दोन तालुक्यांमधील आहेत.

दरम्यान सोमवारी दोन रुग्णांचा, तर रविवारी तिघाजणांचा करोनामुळे मृत्यू ओढवला. एका रुग्णाचा मृत्यू १३ सप्टेंबरला एका खासगी रुग्णालयात झालेला होता. त्याची नोंद सोमवारी करण्यात आली आहे. त्यातील पाच जणांचे मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. मृतांच्या आकडेवारीत सहा जणांची भर पडली आहे. दापोली, रत्नागिरी, लांजा, चिपळूण येथील प्रत्येकी एक तर खेडमधील दोन रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.

गेल्या शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र ३ सप्टेंबरपासून नोंद करणे राहून गेलेल्या पाच मृतांची आकडेवारीत भर पडली. यामध्ये सर्वाधिक चार रुग्ण हे खासगी रुग्णालयात मृत पावलेले आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी प्रत्येकी २ रुग्ण मरण पावले.

शुक्रवारी ५ रूग्णांच्या मृत्युची नोंद झाली. त्यापैकी एक रुग्ण आठ दिवसांपूर्वी मृत पावलेला आहे. उर्वरित आधीच्या दोन दिवसातील आहेत.

जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यांमध्ये मिळून मृतांची एकूण संख्या २५६ झाली आहे. रत्नागिरी (७१) आणि चिपळूण (६२) हेच दोन तालुके याही बाबतीत आघाडीवर आहेत. त्या खालोखाल खेड (४५) आणि दापोली (२८) तालुक्यात करोनामुळे जास्त रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

जिल्ह्याचा मृत्यूदर साडेतीन टक्कय़ांवर पोचला असून तो कमी करण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे. ताप, सर्दी, खोकला असे आजार असलेल्यांवर त्वरीत उपचार व्हावेत. यासाठी आरोग्य पथके गावपातळीवर तपासण्या करीत आहेत. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू दर खाली येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

सिंधुदुर्गात २४८२ करोनामुक्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपर्यंत २ हजार ४८२ करोनाबाधित रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सोमवारी आणखी ३७ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ६७९ तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८५ झाली आहे, रविवारी ती ८० होती. जिल्ह्यात अजून ८७ करोना तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.तर जिल्ह्यात १६ हजार ४६० नागरिक अलगीकरणात राहिले आहेत.त्यात गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणात ३ हजार ४८४ तर नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात १२ हजार ९७६ नागरिक आहेत.