पनवेल पालिकेचा प्रस्ताव; प्रत्येक जोडणीसाठी साडेआठ हजार

पनवेल : पनवेलमधील पाणीप्रश्न कायम असून शहरासाठी २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये म्हणून नळजोडण्यांना जलमापके बसविण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. ५,२७६ नळांना जलमापके बसविण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

यात पनवेल पालिका क्षेत्रातील २९ गावे व जुन्या नगर परिषदेच्या परिसरातील नळांना हे जलमापक बसविण्यात येणार आहेत.

पनवेल पालिका क्षेत्रात अमृत योजनेचे काम सुरू असून अजून दीड वर्ष पनवेलचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जाणार आहे. अजून दोन उन्हाळे नागरिकांना संयमाने आणि काटकसरीने पाणी वापरावे लाग्णार आहे. सध्या सिडको वसाहतीमध्ये सुमारे २६ हजार नळजोडण्या आहेत. तेथे १७५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तसेच जुन्या नगर परिषद क्षेत्रात ८,४२५ नळजोडण्या आहेत. त्यांना सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पनवेलच्या २९ गावांमध्ये ७,३८१ नळजोडण्या आहेत त्यांना १५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.

पनवेल पालिका प्रशासनाने सहा महिन्यांत पालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ५,२७६ विनाजलमापक नळजोडण्यांचा शोध घेतला आहे. पालिका क्षेत्रात सर्वच जलजोडण्यांवर जलमापके असल्यास पालिकेला नेमके किती पाण्याची गळती होत आहे याची नोंद ठेवून भविष्याचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे ५,२७६ नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याच्या विषयाला गुरुवारी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यास प्रत्येक जलजोडणीधारकाला जलमापकाची सुमारे आठ ते साडेआठ हजारांचा खर्च करावा लागणार आहे. अर्थात हा खर्च पालिका त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या सवलतीच्या हप्त्यांमधून वसूल करण्याचे नियोजन आहे.