विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला.
करोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ही वेळ आंदोलन करण्याची नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज आर्सेनिक एल्बम गोळ्या, जिल्हा परिषद सदस्यांना टॅब वाटप करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुश्रीफ यांनी करोनाच्या काळातही राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. करोनाच्या काळात महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तरी देखील विरोधक आंदोलनं करत आहेत. मात्र ही वेळ आंदोलनाची आणि टीका टिप्पणीची नसून सरकारला सहकार्य करण्याची आहे. करोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आंदोलनं करून बिळात लपून बसण्यापेक्षा एखादे वेळी करोना वॉर्डात पीपीई कीट घालून विरोधकांनी जाऊन यावं असा टोलाही त्यांनी लगावला.
आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना देऊ म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या गोळ्या दोन रुपयांना का दिल्या नाही? असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. तसेच, आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच चुकीची विधानं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालकमंत्री सतेज पाटील हे अतिउत्कृष्ट काम आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सतेज पाटील आणि आपल्यामध्ये सुसंवाद आहे, जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नावर आपली आणि त्यांची चर्चा होत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी जाहीरपणे सांगितल. करोनाच्या काळात जिल्हा परिषद सदस्यांनी गावोगावी जाऊन लोकांची विचारपूस करावी, असे आवाहन त्यांनी केले.