जिल्हाबंदीमुळे भाजी उत्पादक शेतक-यांच्या हक्काच्या बाजारपेठा हातून गेल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांना कवडीमोल भावात भाजीपाला व फळे विकावी लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजी उत्पादकांना रास्त भाव मिळण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दयावी, असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

विश्रामगृह येथे यासंदर्भात आमदार डॉ.पंकज भोयर यांनी मंगळवारी बैठक घेतली. बैठकीला जिल्हा कृषि अधीक्षक अनिल इंगळे, कृषि अधिकारी विवेकानंद चव्हाण व अन्य उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी वर्धा व सेलू विधानसभा क्षेत्रात भाजी उत्पादक शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील शेतकरी चांगला भाव मिळत असल्याने बुट्टीबोरी व नागपूर येथे भाजीपाला व फळ विक्रीस नेत होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. परिणामी जिल्ह्यातील भाजीपाला व फळे विक्रीस अन्य जिल्हयात नेता येत नाही. त्यामुळे नागपूरसारखी मोठी बाजारपेठ शेतक-यांच्या हातून गेली असल्याचे सांगितले.

तसेच, जिल्ह्यातील बाजारपेठेत भाजी उत्पादकांचा माल पडेल त्या भावात खरेदी करण्यात येत आहे.  मात्र कवडीमोल भावात विकत घेतलेला माल ग्राहकांना चार ते पाच पट भावात विकल्या जात आहे.एकीकडे शेतक-यांना भाव मिळत नाही आहे तर दुसरीकडे ग्राहकांना चढया दरात भाजीपाला व फळे विकल्या जात आहे. अशा स्थितीत शेतकरी व ग्राहकांची थेट साखळी जोडणे निकडीचे आहे. जेणेकरून शेतक-यांना योग्य भाव मिळेल व ग्राहकांवर आर्थिक भार पडणार नाही. यासाठी कृषि विभागाने भाजीपाला व फळ उत्पादक शेतक-यांची माहिती गोळा करावी. प्रत्येक गावात भाजी उत्पादकांचा गट तयार करून प्रशासनाने तयार केलेल्या भाजी बाजारात त्यांना दुकान उपलब्ध करून दयावे. यामुळे शेतकरी व ग्राहक असा संबंध जोडल्या जाईल.  तसेच शेतकरी व ग्राहकांना त्यांचा लाभ होईल. हे करत असताना कोणत्या बाजारात किती माल येणार आहे याचे नियोजन करावे. नाही तर एखादया बाजारात भाज्यांची प्रचंड आवक होईल व दुसरीकडे कमतरता भासेल, असे होता कामा नये, अशी सूचना केली. भाजी उत्पादक शेतक-यांसाठी कृषि कार्यालयात नोंदणी कक्ष सुरू करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.