करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळ खबरदारीच्या उपाय योजना करीत आहे. एसटी अविरत प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असून ती अधिक सक्षमपणे कार्यरत राहावी तसेच एसटी महामंडळातील प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिले आहेत.

एसटी बसेसची तसेच बसस्थानकांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करणेबाबत यापूर्वीच परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांनी निर्देश दिले असून याप्रमाणे बसेस व बसस्थानकांची स्वच्छता करण्यात येत आहे. प्रवाशांच्या संपर्कात येणारे एसटी महामंडळाचे कर्मचारी उदा. वाहक, कंट्रोल केबिनमधील वाहतूक नियंत्रक व बसस्थानकातील वाहतूक पर्यवेक्षक, कॅश आणि इशूमधील कर्मचारी यांना करोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांना दररोज डिस्पोजल मास्क पुरविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिले आहेत.