प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे व्यावसायिकांमध्ये सध्या गोंधळाची स्थिती असून, कारवाईची भीतीही निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात पुणे शहरातील व्यावसायिकांनी सोमवारी (२५ जून) एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनचा या बंदमध्ये सहभाग असून, इतर सर्व व्यावसायिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाची शनिवारपासून (२३ जून) अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, या बंदीबाबत काहीशी गोंधळाची स्थिती असल्याचे स्पष्ट आहे. सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे कोणते प्लास्टिक वापरायचे आणि कोणते नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच प्रशासकीय अधिकाºयांकडूनही त्याबाबत माहिती दिली जात नाही.

अशा परिस्थितीमुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. प्लास्टिक बंदीचा मिठाई, डेअरी आणि फरसाण व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. प्लास्टिक बंदी करताना सरकारने पर्यायही उपलब्ध करून दिलेला नाही. प्लास्टिक वापराविरोधात सर्वाधिक कारवाई पुण्यातच केली जात आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणाविरोधात असोसिएशनने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.