तुटवडा असल्याने नागरिकांची ससेहोलपट; प्रत्येक केंद्रावर जेमतेम १०० जणांनाच लस

वसई : वसई- विरार शहरात लशींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लस घेण्यासाठी नागरिक मध्यरात्री दोन वाजलेपासून रांगा लावत आहे. मात्र तरी देखील त्यांच्या पदरी निराशा येत आहे. पालिकेकडून लस साठ्याबाबत माहिती दिली जात नसल्याने गैरसोय होत आहे.

खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होत नसल्याने पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर अवलंबून रहावे लागत आहे. पालिकेच्या १२ नागरी आरोग्य केंद्रात, दोन रुग्णालयात आणि एका करोना केंद्रात लसीकरण सुरू आहे. आरोग्य केंद्रात एक दिवसाआड लसीकरण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या केंद्रावर होऊ  लागली आहे. त्यातच पालिकेला मिळणार लसींचा साठा कमी असल्याने प्रत्येक केंद्रावर जेमतेम १०० जणांच्या आसपास लस मिळते.

बुधवारी नालासोपारा येथील पाटणकर पार्क आरोग्य केंद्रात लसीकरणावरून मोठा गोंधळ उडाला. येथील नागरिकांनी पहाटे ३ पासून रांगा लावल्या होत्या. परंतु जेमतेम ५० लोकांना लस देण्यात आल्यानंतर लस संपल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे एकच गोंधळ उडत आहे. ५ ते ६ तास रांगेत उभे राहूनही नंबर न आल्याने नागरिक संतप्त झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर उर्वरित नागरिकांना पुढील फेरीसाठी क्रमांक देण्यात आले. पालिकेने लसीकरण करण्यासाठी कुठल्याच प्रकारचे नियोजन केलेले नाही. नागरिकांना कुठलीही माहिती दिली जात नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत आहे, असे नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ते किरण बनसोडे यांनी सांगितले. पालिकेकडे लशींचा तुटवडा आहे. जेवढ्या लशी केंद्रात आहेत त्याची माहिती आधीच दिली तर नागरिक तासन्तास रांगा लावणार नाही आणि त्यांचा त्रास वाढेल असेही बनसोडे यांनी सांगितले.

सर्वच लसीकरण केंद्रावर अशीच परिस्थिती दिसून येत आहे. ऑनलाइन नोंदणी केली तरी ती होत नाही. थेट लसीकरणासाठी गेलो तर भलीमोठी रांग असते. रांगेत तास्नतास उभे राहूनही नंबर येत नाही, अशी तक्रार प्रशांत मिनेझिस यांनी केली आहे. मुंबई शहरातील केंद्रात लसीकरण पटकन होते, मग वसई-विरार शहरात लस का मिळत नाही, असा सवालही त्यांनी केला.

पुरवठा कमी

नागरिकांकडून लशींची मागणी वाढली आहे. मात्र पुरवठा कमी होत असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली. शासनाकडून जेवढ्या लस कुप्या येतात तेवढ्या सर्व केंद्रावर समान वाटप होते. मुळात लस पुरवठा कमी असल्याने त्या लवकर संपतात. शासनाकडून अधिक लस कुप्या मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. नागरिकांनी संयम बाळगून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.