गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडय़ावर पाऊस मेहरबान झाला आहे. बुधवारी दिवसभर संततधार पाऊस होता. काही जिल्ह्य़ांमध्ये कमी, तर काही ठिकाणी दिवसभर सरीवर सर येत होत्या. त्यामुळे कोमेजून गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. अजूनही मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १५ मिमी पाऊस नोंदविला गेला. दिवसभर शहरात जोरदार सरी येत होत्या. सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी होता. दुपारी चारनंतर जोरदार पाऊस झाला.
उस्मानाबादेत दमदार
उस्मानाबाद जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ५६.३ मिमी, तर सर्वात कमी कळंब तालुक्यात १०.७ मिमी पावसाची नोंद झाली. सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले. सिंचन प्रकल्पांमध्येही काही प्रमाणात पाणी साठले असल्याचे दिसून आले.
जालन्यात वीज पडून एक ठार
जालना जिल्ह्य़ात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २७ टक्केच पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे पिकांवर विपरीत परिणाम झाला. परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची नजर आहे. गेल्या दोन दिवसांपासून थोडा का असेना पाऊस सुरू झाला. पोळ्याच्या दिवशी बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला. काही भागातील ओढे-नालेही वाहू लागले. जाफराबाद तालुक्यातील भारजबुद्रुक येथे वीज पडल्याने शेतात काम करणारे राजू आनंदा बोडके यांचे निधन झाले. भोकरदन तालुक्यातील केळणा, जुई, पूर्णा या नद्या पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिल्या.