मुंबई शहर, उपनगर, पिंपरी-चिंचवड, नाशिक व औरंगाबादसह राज्यातील विविध ठिकाणी बुधवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या अगोदर हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर, रब्बी पिकास अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा कुलाबा वेधशाळेन अंदाज वर्तवलेला आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसेच स्थानिक वातावरण यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे.

तर ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील गारवा अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचेही पाहायला मिळाले. कल्याण, डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद, संगमनेर यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या पावसाने काढणीला आलेले पिकांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रब्बी पिकास या अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवडय़ात किमान तापमान कमी झाले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणात झपाटय़ाने बदल झाले आहेत. तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. या भागातून राज्याकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असले, तरी पावसाळी स्थितीमुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.