दोन दिवसांपासून कडक उन्ह तापत असतांनाच आज सायंकाळी जिल्ह्य़ात सर्वदूर अकाली वादळी पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीट झाली, तर वीज कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू व एक जखमी झाला. यावेळी चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, दरम्यान, गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव तालुक्याला वादळी पाऊस आणि गारपिटीने आज सायंकाळी झोडपले.

मार्चच्या पंधरवडय़ानंतर या जिल्ह्य़ात कडक उन्ह तापत आहे. असे असतानाच आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जिल्ह्य़ात सर्वदूर अवकाळी वादळी पाऊस सुरू झाला. ब्रम्हपुरी, चिमूर, मूल, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा तालुक्यात जोरदार, तर तर तळोधी बाळापूर येथून जवळच कोटगीमाल परिसरात गारांसह पाऊस सुरू होता. यावेळी विजांचा कडकडाटही सुरू होता. याच सुमारास वीज कोसळून अरविंद पांडूरंग मेश्राम या ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला, तर त्याचा अन्य एक सहकारी जखमी झाला. एका शेतात शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने चार शेळ्या मरण पावल्या. चंद्रपूर शहरातही मुसळधार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला.