मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे शनिवारी एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास ते अनपेक्षितपणे विश्वजित कदम यांच्या भेटीसाठी भारती रूग्णालयात पोहोचले. रुग्णालयात आल्यानंतर विश्वजीत कदम यांनी राज यांचे स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि अन्य पदाधिकारी होते. रुग्णालयातील एक केबिनमध्ये सुरूवातीच्या गप्पा झाल्यानंतर विश्वजित कदम यांनी सर्वांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर बंद दरवाज्याआड राज आणि विश्वजित कदम यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा सुरू होती. यादरम्यान काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते बाहेर ताटकळत उभे होते.

नाणार रिफायनरीला मनसेचाही विरोध ; राज ठाकरेंची घोषणा

दरम्यान, राज आणि विश्वजीत कदम यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळेच या भेटीबाबतचे गुढ आणखीनच वाढले आहे. ही चर्चा राजकीय होती की मैत्रीपूर्ण, यावरून जिल्ह्यात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज ठाकरे यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या बफरझोनच्या जंगलात होणाऱ्या वाघांच्या शिकारीवरून तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांना धारेवर धरले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही राज यांनी पतंगराव कदम आणि त्यांच्या भारती विद्यापीठावर जाहीर टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कटुता होती. मात्र, आज राज आणि विश्वजीत यांच्यात झालेल्या अनपेक्षित मनोमीलनामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ही भेट संपल्यानंतर राज ठाकरे भारती रुग्णालयातून लगेचच पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर राज यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या समाधीच दर्शन घेतले. यावेळीही काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील आणि विशाल पाटील हे उपस्थित होते. त्यामुळे सध्या नव्या राजकीय समीकरणांविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.

देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने-राज ठाकरे