राज्य शासनाने ४४ टोल नाके बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केवळ एक नाटक आहे. त्या निर्णयाची वस्तुस्थिती तपासून पाहिली जाईल. या आधी शासनाने ६६ टोल नाके बंद करण्याबाबत केलेली घोषणा, राज्याचे नवीन टोल धोरण, महत्वाच्या महामार्गावर केली जाणारी अवास्तव टोल आकारणी, केंद्र सरकारच्या निकषांचे सर्रास होणारे उल्लंघन या त्रुटी कधी दुरुस्त करणार, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाच्या ४४ टोल नाके बंद करण्याच्या निर्णयावर मत प्रदर्शन केले. राज्यातील जे टोल नाके बंद करण्याचे जाहीर झाले, त्यांची वस्तुस्थिती तपासणीचे निर्देश आपण मनसेच्या आमदारांना दिले आहेत. ही संपूर्ण माहिती संकलीत झाल्यावर त्याचे खरे स्वरुप लक्षात येईल. मुळात, हा निर्णय आधीच घेणे आवश्यक होते. मनसेने टोल विरोधात आंदोलन केल्यावर शासनाने ६६ टोल नाके बंद करण्याचे जाहीर केले होते. परंतु, त्याचे पुढे काय झाले ते स्पष्ट झालेले नाही. टोल नाके बंद करून हा प्रश्न सुटणार नाही. महत्वपूर्ण महामार्गावरील वाहनधारकांची लूट सुरूच आहे, असेही राज यांनी नमूद केले.