राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन बरीच वर्ष लोटली असली तरी राज ठाकरे यांचे मातोश्रीवर स्थान अजूनही कायम आहे. ‘मातोश्री’वर डिजिटल स्क्रीनवर शिवसेनेचा प्रवास दाखवण्यात आला असून यामध्ये राज ठाकरेंच्या छायाचित्राचाही समावेश आहे. या डिजिटल स्क्रीनवरील छायाचित्रांद्वारे ‘टाळी’चा संदेश तर दिला जात नाहीये ना, अशी कुजबूज पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर दरवाज्याजवळ डिजिटल स्क्रीन असून यावर शिवसेनेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या छायाचित्रांचा समावेश आहे. या छायाचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांच्या छायाचित्राचादेखील समावेश आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत राज ठाकरे मंचावर असल्याचे छायाचित्रही डिजिटल स्क्रीनवर वारंवार येतात, असे सांगितले जाते.

निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु होती. राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना टाळीची साद घातली होती. आता पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना साद घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

डिजिटल स्क्रीनवरील छायाचित्रांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असले तरी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचे हे छायाचित्र लक्षवेधी ठरत आहे. ठाकरे कुटुंबाचे हे छायाचित्र पाहण्यासाठी उपस्थितांची पावले आपसूकच डिजिटल स्क्रीनकडे वळत आहेत.