काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी हिंगोलीचे माजी खासदार व राज्यातील काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजीव सातव यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय राहुल गांधी, प्रियंका गांधी व अहमद पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. काँग्रेसचा महाराष्ट्रातील एक तरुण चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या एका जागेवर  नेमकी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे या पार्श्वभूमीवर आठ नावं दिल्याची माहिती आहे. यामध्ये राजीव सातव, मुकुल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे या नेत्यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, यामध्ये राजीव सातव यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा देखील केली जाण्याची शक्यता आहे. कारण, उद्या(शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

महाराष्ट्रातील जे नेते राहुल गांधी यांच्या ब्रिगेडमधले मानले जातात त्यामध्ये राजीव सातव हे एक आहेत. शिवाय ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ देखील आहेत. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ आहे. मागील वेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जात असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तर, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा केल्यावर दुसऱ्या उमेदवार फौजिया खान या अर्ज दाखल करणार आहेत, असे पवार यांनी सांगितलेले आहे.

येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार आहेत. भाजपाच्या वाट्याला यापैकी तीन जागा येणार आहेत. यातील दोन जागांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. एका जागेवर उदयनराजे भोसले तर दुसऱ्या जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर एका जागेवरील नावासाठी अद्याप निर्णय झालेला नाही.