कोल्हापूर : दूध दरात घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे. या शेतकऱ्यांचे दुधाला अनुदान देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटना यांनी शुक्रवारी एकाचवेळी आवाज उठवला आहे. या मुद्यावरुन माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सदाभाऊ खोत आमने सामने आले असून शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालणारा मुद्दा ऐन पावसाळ्यात तापण्याची चिन्हे आहेत.

करोना संसर्ग वाढू लागल्यानंतर दुधाचे दर घसरले. महानगरातील दुधाची विक्री घटली. दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित खाद्यपदार्थ, मिठाईची मागणी थांबली. हॉटेल,आईस्क्रिम, विवाह समारंभ यावर परिणाम झाल्याने दुधाच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे. टाळेबंदीमुळे राज्यात पिशवीबंद दुधात २० लाख लिटरने घट झालेली आहे. राज्यशासनाने १० लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेऊनही दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत.

दूध उत्पादक नुकसानीत

उलट, अलीकडे दूध दरात घट झाली आहे. दूध दर प्रतिलिटर सुमारे १० रुपयांनी कमी झाले आहेत. गाय दूध २५ ते ३० रुपये असणारा दर आता १८ ते २२ रुपये झाला आहे. म्हैस दूध ३५ – ४० रुपये असताना त्यातही मोठी घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे जनावरांच्या संगोपन खर्चात सुमारे १० टक्के वाढ झाली आहे. उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसत नसल्याने दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या भरडला जात असताना त्यांच्या भावनांना हात घालण्यासाठी शेट्टी आणि खोत यांच्या शेतकरी संघटना एकाचवेळी आंदोलनात उतरल्या आहेत.

सत्तेतील स्वाभिमानी रस्त्यावर
दुधाला प्रतिलिटर ५ रूपये तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावणाच्या पहिल्या दिवशीच (२१ जुलै) राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन होणार आहे. केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप न केल्यास टाळेबंदी मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

विरोधकांचा राज्यशासनावर निशाणा
याचवेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यशासनावर निशाणा साधत १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध आंदोलन आयोजित केल्याची घोषणा केली आहे. रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय जनता किसान मोर्चाने राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रति लिटर ३० रुपये दराने खरेदी करावे, अशी मागणी केली आहे.