News Flash

चर्चा खूप झाली, आता कृती करा

मोदी यांच्या भाषणावर खासदार राजू शेट्टी यांनी मात्र जोरदार आक्षेप घेतला आहे.

राजू शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

उत्पादन वाढविण्यासाठी साखर उद्योगाने बदल करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात ‘वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट’च्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात केले. उसाच्या गाठींमधील अंतर वाढवा, उसाच्या क्षेत्रात डाळींची पिके घ्या, इथेनॉलचे उत्पादन वाढवा, ठिबक सिंचनावर भर द्या, पाण्याचा वापर कमी करा, असे अनेक सल्लेही पंतप्रधानांनी याप्रसंगी दिले. शेतकऱ्यांवर कराचा बोजा लादला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. मोदी यांच्या या भाषणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मात्र जोरदार आक्षेप घेतला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हा घटक पक्ष असला तरी शेट्टी यांनी मोदी यांच्या धोरणावर टीका केली आहे. माजी सहकारमंत्री व काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनीही मोदी यांनी सारे जुनेच उपाय सुचविल्याचे सांगत यात नवीन ते काय, असा सवाल केला आहे. या संदर्भात राजू शेट्टी यांनी मांडलेली भूमिका

साखर उद्योगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत विचार मांडले. शेतकऱ्यांना अनेक सल्ले दिले. पाण्याचा वापर कमी करा इथपासून इथेनॉलचे उत्पादन वाढवा, अशा  विविध कल्पना मांडल्या. हे सारे अनेक वर्षे आम्ही ऐकत आलो किंवा या सुधारणा करा, अशा मागण्या करीत आहोत. हे सल्ले किंवा उपदेशाचे डोस खूप झाले. हे सारे सल्ले शेतकरी किती वर्षे ऐकणार? कारण आम्ही मागणी करायची आणि राज्यकर्त्यांनी त्यात सुधारणा करतो, हे सांगायचे हे सारे जुने झाले आहे. मोदी हे राज्यकर्ते आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत. नुसते सल्ले देण्यापेक्षा शेतीत सुधारणा करण्यासाठी कृती करण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने नुसतीच चर्चा होते. प्रत्यक्ष काहीच होताना दिसत नाही. आता चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची खरी गरज आहे.

पंतप्रधानांनी उसाच्या क्षेत्रात डाळींचे उत्पादन घ्यावे, अशी सूचना केली आहे. हरभरा, तूर लागवड करून डाळींमध्ये देश स्वयंपूर्ण करा, अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. डाळींचे पीक घ्यायला काहीच हरकत नाही, पण डाळींना भाव मिळेल याची हमी सरकार देणार का? दराबाबत शाश्वती नसल्याने शेतकरी डाळी करण्यास तयार होत नाहीत. आम्ही अनेक वर्षे डाळींना हमी भाव द्यावा, अशी मागणी करतो, पण सरकारकडून काहीच प्रतिसाद दिला जात नाही. नुसते आवाहन करण्यापेक्षा पंतप्रधानांनी हमी भावाबाबत पुढाकार घ्यावा. एकीकडे डाळींचे उत्पादन वाढवा, असे आवाहन करायचे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापाऱ्यांना खूश करायचे हे दुटप्पी धोरण ठेवता कामा नये.

पाण्याचा वापर कमी करावा हे पंतप्रधानांचे आवाहन योग्यच आहे. ठिबक सिंचनावर भर द्यावा, ही त्यांची भूमिका आहे. पण शेतकऱ्यांना अनुदान मिळताना किती त्रास होतो याचा एकदा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा म्हणजे नको ते अनुदान म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर का येते हे त्यांना समजू शकेल. बांबू लागवडीबाबतही असेच आहे. डोंगराळ भागात बांबूची लागवड करता येते. बांबू लागवडीला प्रोत्साहन द्यावे, अशी अनेक वर्षे मागणी केली जाते. पण आश्वासनांपलीकडे काहीच होत नाही. मोदी यांनी भाषणात तसा उल्लेख केल्याने निदान आता तरी काही तरी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.

इथेनॉलच्याबाबतीही हेच आहे. उत्पादन वाढवा म्हणून पंतप्रधान आवाहन करतात. यातून आखातातून आयात करण्यात येणाऱ्या इंधनाचे प्रमाण कमी होईल, असा दावा करतात. मग इथेनॉलसाठी अनुदान वाढवून दिले जावे. शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक वर्षे तशी मागणी केली जाते. सरकारची कृती आणि उक्ती यात फरक असतो.

पंतप्रधानांनी साखर उद्योगात बदल करण्याकरिता सुचविलेले उपाय चांगले आहेत. गेली आठ ते दहा वर्षे सातत्याने आम्ही हेच विषय घेऊन सरकार दरबारी खेटे घालत आहोत. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद दिला जात नाही. स्वत: पंतप्रधानांनी या विषयावर मतप्रदर्शन केल्याने आता मोदी यांनी स्वत:च पुढाकार घ्यावा तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भले होऊ शकेल. नाही तर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच वेळ येईल. या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. पण त्या दृष्टीने काही हालचाली होताना दिसत नाहीत.

सारे जुनेचहर्षवर्धन पाटील

साखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषय मांडले. उसासाठी पाण्याचा वापर कमी करावा हे सातत्याने बोलले जाते. उसाच्या गाठींमधील अंतर कमी करा ही तर अनेक वर्षांची सूचना आहे. पंतप्रधानांनी मांडलेली मतेही जुनीच आहेत. नव्याने काय करणार हे सांगण्याची गरज होती. तसे काही झालेले दिसत नाही. राज्यात साखर उद्योगाला मदत करणे हे अपरिहार्य असताना राज्यातील सरकार साखर उद्योगावर आपले नियंत्रण कसे वाढविता येईल यावर भर देत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण आड येऊ नये, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:23 am

Web Title: raju shetty appeal narendra modi on sugarcane issue
Next Stories
1 शेतकऱ्यांना आता ‘चलनदुष्काळा’चा फटका!
2 जयंत पाटील यांची राजकीय कोंडी
3 मुख्यमंत्री, राणे, तटकरेंमुळे प्रचारात रंगत
Just Now!
X