शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळी आणणार कोठून?  साताबारा कोरा करू असं म्हणाला होता, मग आता सरकार आलं आहे. सातबारा कोरा झाला काय? असे सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी राज्य सरकारला उद्देशून केले आहेत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आता सरकार आले आहे. मग सातबारा कोरा झाला काय? कर्जमाफी करण्यासाठी पैसे नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचच्यावतीने कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवनमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांची उपस्थिती होती.

भारतीय किसान सभेच्यावतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ८ जानेवारीला देशभर बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून या दिवशी शेतकऱ्यांची काय ताकद आहे, हे सरकारला समजेल, असा इशारा देखील शेट्टी यांनी यावेळी दिला.

शिवथाळी कोठून आणणार?-
शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे प्रथम बघा. शेतकऱ्यांचं शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळी आणणार कोठून? परवडत नाही म्हणून पिकवले नाही, तर शेवटी आयातच करावे लागेल , अशा शब्दात शेट्टी यांनी राज्यशासनाच्या शिवथाळी बद्दल खरमरीत टीका केली.

कोल्हापूर जिल्ह्यात नवे पदाधिकारी-
आज स्वाभिमानी संघटना व पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये स्वाभिमानी पक्ष – जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, हातकणंगले , स्वाभिमानी संघटना जिल्हा अध्यक्ष – जनार्दन पाटील, करवीर कार्याध्यक्ष – रमेश भोजकर, हातकणंगले युवा आघाडी – सागर शंभूशेटे, अजित पवार आदींची निवड करण्यात आली आहे.