मोहन अटाळकर, अमरावती

माळी, तेली समाजासह इतर मागासवर्गीय आणि दलित मतांच्या एकीकरणातून अनेक वर्षांपुर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ‘अकोला पॅटर्न’ यशस्वी करून दाखवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा प्रभावही बराच काळ टिकला. पण कालौघात राजकारण बदलत गेले. भारिप-बहुजन महासंघाच्या विस्ताराला मर्यादा आल्या. आता वंचित बहुजन आघाडीत एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिमांना जोडण्याचा प्रकाश आंबेडकर यांना जोडण्याचा प्रयत्न आहे. पश्चिम विदर्भात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमने चुणूक दाखवली आहे. काँग्रेसपासून दुरावलेला मुस्लिमांचा एक गट एमआयएमच्या मागे उभा ठाकलेला दिसत असताना भारिप-बहुजन महासंघाला आपला जनाधार देखील टिकवून ठेवावा लागणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती आणि बुलढाण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करून लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी सज्ज असल्याचे संकेत दिले खरे, पण यातून रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई हे दुखावले गेले. ते स्वत: अमरावतीतून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. डॉ. गवई यांनी आघाडीचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला होता. पण, त्यांनी तो नाकारला.

विधानसभेत भारिप-बहुजन महासंघाचे एकमेव आमदार बाळापूरचे बळीराम सिरस्कार हे आहेत. त्यांना बुलढाण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या पुढाकारातून शेगाव येथे वंचित माळी आघाडीची परिषद आयोजित करण्यात आली होती. माळी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी या परिषदेतून मांडली होती. ते बाळापूरचे आमदार असताना त्यांना अकोला जिल्हा सोडून थेट बुलढाण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरविण्यामागे प्रकाश आंबेडकरांचे काय गणित आहे, याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीतून गुणवंत देवपारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी बसपतर्फे अमरावतीतून लढत दिली आहे. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

त्यातच अलीकडच्या काळात बहुजन समाज पक्षाने पक्षसंघटनात्मक बांधणीतून दलित आणि ओबीसी एकत्रिकरणाचा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही प्रमाणात यशस्वी करून दाखवला आहे. मोठय़ा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाच्या मर्यादा उघड झाल्याने आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरूणांच्या गटाला आक्रमक भीम आर्मीचे राजकारण खुणावू लागले आहे. रिपब्लिकन पक्षाचे गट अजूनही विखुरलेलेच आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘रिपाइं विरहीत’ वंचित बहुजन आघाडी कोणता चमत्कार घडवून आणू शकेल, याची उत्सुकता असेल.

राजेंद्र गवई नाराज

प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती आणि बुलढाण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करून लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी सज्ज असल्याचे संकेत दिले खरे, पण यातून रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई हे दुखावले गेले. ते स्वत: अमरावतीतून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. डॉ. गवई यांनी आघाडीचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला होता. पण, त्यांनी तो नाकारला.