माणुसकीला कलंक फासणाऱ्या बलात्कारासारख्या घटनेतील आरोपी कोणत्याही जातीचा असो, त्याचे हात-पाय तोडायला पाहिजेत, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिक घटनेबाबत खंत व्यक्त केली. अशा घटनांमध्ये फाशीची शिक्षा आहे, मात्र मी स्वत: संसदेत हात पाय तोडण्याचा कायदा संमत  करावा, अशी मागणी केली होती, असेही आठवले यावेळी म्हणाले. अमरावती येथे आयोजित बुद्ध महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी आठवले बोलत होते. कोपर्डीनंतर नाशिकमध्ये अत्याचाराची घटना समोर आली आहे.  त्र्यंबकेश्वरमधील तळेगावात  एका अल्पवयीन मुलाने बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून ही घटना निंदनीय असल्याचे ते म्हणाले. या घटनेनंतर नाशिकमध्ये सवर्ण समाजाने दलित वस्तीवर हल्ला करत त्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. यापार्श्वभूमीवर  राज्यातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न कोणत्याही समाजाने करू नये, असे आवाहन आठवले यांनी  केले.

शनिवारी नाशिकच्या तळेगाव गावात एका पाच वर्षीय लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर आज दिवसभर नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी आंदोलन केले. तसेच अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
नाशिक-मुंबई महामार्ग ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. याच महामार्गावर अनेक बस जाळण्यात आल्या. परिणामी एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून सुरु असणारे आंदोलन रात्री थोड्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र, रात्री पुन्हा आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन वाहनांवर दगड फेक करण्यास सुरुवात केली होती.