रामदास आठवले यांचा टोला

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दल केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचे कोणतेही वक्तव्यच मुळी दखलपात्र नसते. सत्ता गेल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली.

येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवानांच्या रक्ताची दलाली करीत असल्याचा आरोप केला, पण त्यांचे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही. उरीतील हल्ल्यानंतर भारताच्या सैन्याने प्रतिकार करून उत्तम कामगिरी केली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमधून काँग्रेसमधील अस्वस्थता जाणवत आहे. काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींना ‘मौत के सौदागर’ म्हणत असला, तरी ते खऱ्या अर्थाने ‘विकासाचे जादूगार’ आहेत. आरक्षणाच्या मुद्दय़ावर ते म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल.