दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार की समेट?

जालना

लक्ष्मण राऊत, जालना गेल्या सलग सहा निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झालेला असून त्यापैकी चार वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. सलग सहा वेळेस पराभव झाल्यामुळे या वेळेस दानवे यांच्याविरुद्ध सर्वार्थाने सक्षम उमेदवार कसा द्यावा हा काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेतृत्वापुढे प्रश्न आहे. त्याच वेळी मित्र पक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात लढण्याचे जाहीर केल्याने चुरस निर्माण होऊ शकते.

या मतदारसंघात भाजपची पाळे-मुळे रुजविण्यात वैयक्तिकरीत्या दानवे यांचा मोठा वाटा आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून तर जालना जिल्हयातील भाजप म्हणजेच दानवे असे अप्रत्यक्ष समीकरण झालेले आहे. काँग्रेस पक्षाची या लोकसभा मतदारसंघात स्वत:ची अशी मतपेढी आहे. परंतु काही अपवाद वगळले तर या पक्षातील नेतेमंडळींनी दानवे यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस आणि भोकरदन तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दानवे यांना जेवढे लक्ष्य केले त्यापेक्षा अधिक लक्ष्य गेल्या दोन वर्षांत शिवसेनेने केलेले आहे. दानवेंच्या विरोधात लढण्यासाठी सर्वार्थाने प्रबळ उमेदवार नसल्याच्या भावनेतून विरोधी पक्षातून एखाद्या नेत्यास पक्षाकडून उभे करण्याचा विचार काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेतृत्वाने सुरू केला आहे. या विचारातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव चच्रेत आलेले आहे. स्वत: खोतकर यांनी अद्याप आपण निवडणूक कशी लढविणार हे जाहीररीत्या स्पष्ट केलेले नसले तरी आगामी निवडणुकीत मत्रीपूर्ण लढत देऊ परंतु दानवे यांची सद्दी संपवू, असे अनेक भाषणांमधून सांगितलेले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तर खोतकर काँग्रेसकडून उभे राहतील हे गृहीत धरून दानवे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रचारास सुरुवात केलेली आहे. अलीकडेच जालना येथे भाजपच्या राज्य कार्यसमितीची बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करून दानवेंनी जणू काही प्रचाराचा नारळच फोडलेला आहे. खोतकर यांचा मित्रपरिवार शिवसेनेव्यतिरिक्त अन्य पक्षांमध्येही आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी स्थानिक पातळीवर संबंध ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळेच जालना विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळेस शिवसेनेचा म्हणजे त्यांचा विजय झालेला आहे. दानवेंप्रमाणेच जनतेच्या संपर्कात राहण्याची खोतकर यांची स्वतंत्र शैली असून त्यामुळेच भाजपला त्यांच्याशी लढत नको आहे.

नुकतेच जालना येथे अखिल भारतीय पशुप्रदर्शन पार पडले. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय अंतर एवढे वाढले आहे की आता त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनाच जाहीररीत्या मध्यस्थी करण्याची वेळ आल्याचे या निमित्ताने दिसले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री या कार्यक्रमात खोतकर यांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही इकडे-तिकडे बघू नका. आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत. मला तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकायच्या आहेत. घरामध्ये वाद-विवाद होत असतातच. तुमची इच्छा असेल तर मोठा भाऊ म्हणून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न मी करीन!’ तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात खोतकर यांचा उल्लेख डायनॅमिक असा करून देशातील सर्वात भव्य पशुप्रदर्शन भरविण्याचा शब्द खरा करून दाखविल्याचे सांगितले. पशुप्रदर्शन विभागाशी संबंधित ज्या तीन-चार मागण्या केल्या होत्या त्याही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या होत्या.

गेल्या वर्ष-दीड वर्षांत दानवे विरुद्ध काँग्रेस अशी चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होण्याऐवजी दानवे विरुद्ध खोतकर हीच चर्चा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये या दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केलेले असून आव्हाने-प्रतिआव्हाने दिलेली आहेत. खोतकर यांनी इकडे-तिकडे पाहू नये हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन म्हणजे त्यांनी काँग्रेसकडून उभे राहू नये असा सल्ला देणारे होते असेच राजकीय वर्तुळात मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर आवाहन केले असले तरी अर्जुन खोतकर यांनी मात्र आता आपण निवडणुकीच्या संदर्भात फार पुढे गेलेलो असल्याचे वक्तव्य केले आहे. दानवे जालना जिल्ह्य़ातील शिवसेना संपवायला निघाले असून ‘हम करो सो कायदा’ या वृत्तीतून ते इतरांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे. आपली उमेदवारी आता जनतेनेच ठरविली असल्याने त्या संदर्भातील निर्णय आता जनतेच्याच हातात आहे, असे ते सांगतात.

खासदार रावसाहेब दानवे यांनी विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढविण्याचे ठरविले असून त्यांची अलीकडील सर्व भाषणे या स्वरूपाची आहेत. गेल्या २८ जानेवारी रोजी जालना येथील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत दानवे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा तपशील जनतेसमोर ठेवला. रस्त्यांचा विकास, ड्रायपोर्ट, सिडकोची नवीन वसाहत उभारण्याचे प्रयत्न, समृद्धी महामार्ग, रसायन तंत्रज्ञान संस्था इत्यादी अनेक उदाहरणे दानवे यांनी विकासाच्या अनुषंगाने दिली. खोतकर निवडणूक लढविणार आहेत का? आणि  त्यांचा पक्ष कोणता असेल असा प्रश्न सध्या जिल्हय़ातील राजकीय वर्तुळात आहे.

यापूर्वी १९९८ मध्ये १८०० मतांनी तर २००९ मध्ये ८४०० मतांनी काँग्रेसचा पराभव करून भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे भाजपचा जालना मतदारसंघात पराभव अशक्य नाही. दानवे त्यांच्या पाठबळामुळे  विकासाच्या नावाखाली कंत्राटदारी करणारे  वर्तुळ  बनले आहे. काँग्रेसपुढे निभाव लागणार नाही याची जाणीव भाजप कार्यकर्त्यांना झाली आहे.

– राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष जालना जिल्हा काँग्रेस

खासदार दानवे यांच्यामुळे मतदारसंघात रस्ते, विकासाची कामे मोठय़ा प्रमाणात झालेली आहेत. ड्रायपोर्ट, रसायन तंत्रज्ञान संस्था, समृद्धी महामार्ग इत्यादींमुळे मतदारसंघाच्या विकासास चालना मिळणार आहे. विरोधक हतबल झालेले आहेत. शिवसेना मित्रपक्ष असल्याने त्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका दानवे यांनी वेळोवेळी मांडली.

– रामेश्वर भांदरगे, अध्यक्ष, जालना जिल्हा भाजप