राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी बांधिल असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केले होते. यावरुनच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोचक टीका टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे टोले लगावले आहेत. ते म्हणाले, “शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं सांगतानाच बाळासाहेब थोरातांची ऑफर हास्यास्पद आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते”.

काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, असे विधान पवार यांनी केले होते. पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. राज्यघटनेतील मूल्यांना आणि ती जपणाऱ्यांना सध्या वाईट दिवस आले आहेत. समाजात-देशात भेद निर्माण करणारे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचंही थोरात यांनी अधोरेखित केलं होतं.

पवार यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे नुकसान होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचं समर्थन केलं होतं. खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखावण्यापेक्षा एकमेकांच्याविरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलं पाहिजे. आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे, असं वडेट्टीवार म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve taunt balasaheb thorat over join congress offer to sharad pawar vsk
First published on: 14-09-2021 at 12:24 IST