12 July 2020

News Flash

रावसाहेब दानवे यांची चढती कमान

१९९० मध्ये काँग्रेसचे त्यावेळचे मातब्बर पुढारी रंगनाथ पाटील यांचा २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून दानवे निवडून आले.

रावसाहेब दानवे

लक्ष्मण राऊत

ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री

ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रवास एका संघर्षमय इतिहासाचा, पक्षनिष्ठेचा आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणातील डावपेचाचा आहे. गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ दानवेंच्या जिल्ह्य़ात असा विरोधी पक्षीयांशी संघर्ष झाला, तसा कधी-कधी मित्रपक्षीयांशी आणि अपवादात्मक परिस्थितीत अप्रत्यक्षरीत्या स्वपक्षीयांशीही झाला. परंतु एखादा अपवाद वगळता दानवेंच्या विजयाची कमान चढतीच राहिली.

स्वतंत्र जालना जिल्हा निर्मिती होण्याच्या अगोदर भोकरदन तालुका त्यावेळच्या औरंगाबाद जिल्ह्य़ात असताना भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समितीचे सभापती होण्याची किमया दानवेंनी घडवून आणली होती. त्यापूर्वी गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच आणि पंचायत समिती सदस्यपदी ते निवडून आले होते. त्यानंतर १९८५ मध्ये झालेली भोकरदन विधानसभेची निवडणूक दानवे यांनी लढविली. परंतु काँग्रेसचे संतोष दसपुते यांच्याकडून एक हजार ५६८ मतांनी पराभूत झाले. पराभव झाला तरी मिळालेल्या मतांमुळे दानवे मात्र जिल्ह्य़ाच्या राजकारणातील चर्चेत आले. पराभवामुळे खचून न जाता दानवेंनी जनसंपर्क चालूच ठेवला. १९९० मध्ये काँग्रेसचे त्यावेळचे मातब्बर पुढारी रंगनाथ पाटील यांचा २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून दानवे निवडून आले.

तेव्हापासून दानवे यांनी भोकरदन आणि जिल्ह्य़ातील राजकारणात आपले जे स्थान निर्माण केले ते कायमच राहत आले. पुढे १९९५ मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. १९९९ पासून पुढे सलग पाच वेळेस ते लोकसभेवर निवडून आले. या काळात सहकार, शिक्षण, क्षेत्रातही त्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. काँग्रेसचे पुढारी रंगनाथ पाटील यांनी इरादापत्र आणलेला, परंतु उभारणी न होऊ शकलेल्या रामेश्वर सहकारी कारखान्यापुढे दानवे यांनी उभा केला. प्रारंभी ते स्वत:, नंतर त्यांचे पुत्र संतोष या कारखान्याच्या अध्यक्षपदी राहिले आणि सध्याही हा कारखाना त्यांच्या अधिपत्याखाली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ते राहिले. त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरही अनेकदा त्यांनी वर्चस्व ठेवले.

दोन वेळेस लोकसभा सदस्यपदी राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिकराव दानवे यांना १९९८ मध्ये पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्या वेळी पुंडलिकराव आणि त्यांच्या समर्थकांनी जालना शहरात पक्षाविरुद्ध आंदोलनात्मक मार्ग निवडला होता. परंतु त्या वेळी रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या भूमिकेसोबतच राहणे पसंत केले होते. नंतरच्या काळात पुंडलिकराव आणि रावसाहेब यांच्यात अंतर पडत गेले. त्याचा परिणाम २००३ मधील भोकरदन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुंडलिकरावांचे पुत्र चंद्रकांत दानवे राष्ट्रवादीकडून उभे राहण्यात झाला आणि तेव्हापासून सलग तीन वेळेस ते विधानसभेवर निवडून आले.

भोकरदनमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला तरी रावसाहेबांनी चिकाटीने मैदान सोडले नाही. २०१४ मध्ये रावसाहेबांनी आपले पुत्र संतोष यास भोकरदनमधून निवडून आणले. चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली, परंतु ती फार काळ टिकली नाही आणि राज्यमंत्रीपद सोडून त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर भाषा आणि काही वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली. परंतु त्याचा कोणताही विपरीत परिणाम दानवेंच्या विजयावर होऊ शकला नाही. बेदरकारपणापासून ते जुन्या सहकाऱ्यांचा विसर पडण्यापर्यंत दानवे यांच्यावर टीका झाली. परंतु दानवे आपल्या पद्धतीने काम करीत राहिले, बोलत राहिले आणि त्यांना यशही मिळत राहिले.

पक्षात उशिरा महत्त्व

रावसाहेब दानवे यांची भाजपमधील राजकीय कारकीर्द ४० वर्षांपेक्षा अधिक काळाची असली तरी पक्षाने त्यांची खरी कदर २०१४च्या निवडणुकीनंतर म्हणजे गेल्या पाच वर्षांतच केली. त्याआधी दोनदा आमदार आणि तीनदा खासदार होऊनही पक्षाने त्यांचा पक्षाध्यक्षपदासाठी विचार केला नव्हता. १९९८ ते २००४ दरम्यान केंद्रात भाजपचे सरकार असताना राज्यातील त्यांच्यापेक्षा कमी अनुभवाच्या खासदाराला राज्यमंत्रीपद मिळाले होते आणि दानवे मात्र त्यापासून दूरच राहिले. परंतु दानवे यांनी त्या वेळीही पक्षाशी एकनिष्ठ राहणेच पसंत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:13 am

Web Title: raosaheb danves top command
Next Stories
1 १५ वर्षांनंतर पश्चिम विदर्भाला मंत्रिमंडळात संधी
2 दुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या
3 हातकणंगलेत ४५९ मते जादा , शेट्टी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Just Now!
X