नागपूर : शेकाटय़ा (ब्लँक विंग स्टील्ट) या पक्ष्याशी साधर्म्य साधणाऱ्या ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा या दुर्मीळ पक्ष्याची नोंद अमरावती येथे घेण्यात आली.  अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संस्था ‘वेक्स’चे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांना हा पक्षी अमरावती येथे आढळून आला.

पक्ष्यांच्या उपप्रजाती, त्यांच्यातील रंगांचे बदल आणि वेगळेपणाचा गेल्या अनेक वर्षांपासून निनाद अभंग अभ्यास करत आहेत. ३० मार्च २०१४ ला शेकाटय़ा प्रजातीचे मानेवर काळ्या रंगाचा पट्टा असलेले पक्षी त्यांना दिसून आले. सुरुवातीला त्यांना हा पिसांच्या रंगातील बदल असावा, असे वाटले. संदर्भ आणि घेतलेल्या माहितीनंतर ऑस्ट्रेलियात शेकाटय़ाची एक उपप्रजाती अशाप्रकारे दिसत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दरवर्षी केलेल्या पाठपुराव्यानंतर २०१५ला डॉ. जयंत वडतकर यांना तर २०१६ मध्ये शिशिर शेंडोकर यांना अकोल्यात या प्रजातीचे पक्षी दिसून आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहाय्यक संचालक   डॉ. राजू कसंबे यांना ही प्रजाती ठाणे जिल्ह्यात २०१६ व २०१७च्या हिवाळ्यात दिसून आली. मानेवर काळा रंग असलेले काही पक्षी शेकाटय़ांच्या थव्यात दिसतात. मात्र, त्यातील बहुतेक हे रंगातील बदल असतात. पूर्वी ही प्रजाती ‘ब्लँक विंग स्टील्ट’ची उपप्रजाती म्हणून गणली जात होती. आता या उपप्रजातीस स्वतंत्र प्रजाती समजले जाते. श्रीलंकेत या प्रजातीच्या नियमित नोंदी असून भारतात गुजरातच्या किनाऱ्यावर या प्रजातीचे पक्षी नोंदवले गेले आहेत. ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा अशी या प्रजातीची नवीन ओळख आहे. या पक्ष्याची छायाचित्रे संबंधित अभ्यासकांना पाठवल्यानंतर गुजरात येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे दिशांत पाराशर्या, श्रीलंकेतील रेक्स डिसिल्व्हा यांनी ही प्रजाती ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा असल्याचे कळवले.

ऑस्ट्रेलिया ते भारताचा पूर्व किनारा आणि तेथून गुजरात येथे विदर्भातून हा पक्षी जातो, असे डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले. ठाण्यासह कोकण किनारपट्टय़ावर या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन स्थलांतरणादरम्यान होते.

या पक्ष्याच्या मानेवर काळ्या रंगाचा पिसांचा पट्टा दिसल्यापासून या प्रजातीवर सातत्याने लक्ष ठेवून होतो. ही वेगळी प्रजाती असावी असे वाटत होते, पण आशियातील पक्षीविषयक पुस्तकात त्याबाबत फारशी माहिती नसल्याने अडचण होती. काही नवीन संदर्भामुळे या प्रजातीला वेगळे सिद्ध करणे सोपे झाले.

– निनाद अभंग, पक्षी अभ्यासक