करोनाच्या वाढत्या फैलावामुळे सर्वत्र काहीसे चिंतेचे वातावरण असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात ३२ नवजात शिशू करोनामुक्त झाल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे.

येथील जिल्हा कोव्हिड रुग्णालायत गेल्या १०० दिवसांत ९० नवजात शिशुंपैकी ३२ जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले. या सर्व बालक आणि मातांवर बारकाईने लक्ष ठेवून आणि वेळेवर औषधोपचार करून सुखरूपपणे घरी सोडण्यात आले आहे.

रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी सांगितले की, माता आणि बालक, दोघेही करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्या बालकांना आईजवळच ठेवून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. मातेचे स्तनपान व नियमाप्रमाणे औषधोपाचार सुरू ठेवले.

बालकामध्ये स्तनपानमुळे प्रतिकार शक्ती चांगली वाढते. नियमित लसीकरणामुळे आणखी हातभार लागतो. संसर्गामुळे बालकांमध्ये  समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होते. त्याची स्वत:ची प्रतिकारशक्तीही काम करत असते. त्यामुळे १० दिवसांत उत्तम प्रतिसाद मिळाला.

अशा प्रकारे या महामारीवर मात केलेल्या माता आणि नवजात बालकांना पुष्पवृष्टी करून घरी सोडण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. मोरे रूग्णालयातील इतर डॉक्टर आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.