गर्दी टाळणे आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना
पालघर : तिसऱ्या टप्प्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आणि जिल्हा, तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आगाऊ नोंदणी खुली न करता ज्या दिवशी नोंदणी, त्याच दिवशी लसीकरण अशी उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केली आहे.
लसीकरणासाठी संकेतस्थळावर किंवा अॅपवर जाऊन आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु लसीकरणाचे ठिकाण बंधनकारक नसल्यामुळे जिल्हा, तालुक्यातील असलेल्या केंद्रांवर जिल्ह्यबाहेरील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. पालघर, डहाणू व जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
येथील शासकीय रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू करण्यात आला आहे. या केंद्रांवर आगाऊ नोंदणी केलेल्या जिल्ह्यबाहेरील नागरिकांची गर्दी होत असल्याने ग्रामीण भागात लसीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे.
स्थानिकांना लसीकरणाची संधी मिळत नसल्याने जव्हार येथील नागरिकांनी सोमवारी लसीकरण बंद पाडले होते.
केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरणापूर्वी त्याची नोंदणी संकेतस्थळ किंवा अॅपवर करणे बंधनकारक केले आहे. नोंदणीविना थेट लसीकरणाच्या ठिकाणी येऊन लस घेणे शक्य नसल्याचे जिल्हा परिषदेच्या लसीकरण विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्मार्टफोन नसणाऱ्या तसेच आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसमोर नोंदणी करणे आव्हानात्मक व गैरसोयीचे ठरणार आहे.
केंद्र शासनाची लस उपलब्ध नाही
एकीकडे राज्य शासनाकडून १८— ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असताना ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणारी लस प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरण सध्या स्थगित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. केंद्राकडून लस उपलब्ध झाल्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.