रायगड किल्ल्याच्या संवर्धन कामातील अनियमिततेबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी आज (२९ डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच इतरही विषयांवर चर्चा केली. रायगड विकास निधी आणि गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांच्या गतीबदल मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी भेटीची माहिती दिली. संभाजीराजे म्हणाले, “मागच्या सरकारनं रायगड संवर्धनासाठी ७०६ कोटी रूपये दिले. रायगड स्वराजाची राजधानी आहे. पण, तिच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्षे झाली, तरीही गडाचे काम काहीच झालेले नाही. या कामासाठी १६.५० टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजे शिवभक्तांचे २३ कोटी रूपये दलालीसाठी द्यायचे का?,” असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

“माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे या कामात चूक व्हायला नको. त्यांचा वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी सुरूवातीपासून याविषयी आवाज उठवत आलो आहे. आजही मुख्यमंत्र्यांना भेटून माझी भूमिका त्यांना सांगितली. असंच काम होणार असेल, तर मला या जबाबदारीतून मुक्त करा,” अशी मागणीही त्यांच्याकडे केली असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

हे काम तुम्हीच करा, दुसरं कुणी करू शकत नाही

जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती अमान्य केली. मुख्यमंत्री म्हणाले, “रायगड संवर्धानाचं काम तुम्हीच करा, हे काम तुमच्याशिवाय दुसरं कुणी करू शकणार नाही. जे लोक भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांना बोलावून विचारणार करू, असं आश्वासनं त्यांनी मला दिलं आहे,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

फेसबुकवर मांडला होता विषय

रायगड किल्ल्यावर काही काम नियमबाह्य होत असल्याचं सांगत संभाजीराजे भोसले यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी दोन दिवसांपूर्वी याविषयी फेसबुकवर आपली भूमिका मांडली होती. रायगडावर ‘रोप वे’चे काम सुरू असून, हे काम नियमबाह्य सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच किल्ल्यावर येणाऱ्या लोकांसाठी सोयीसुविधांसाठी काही करायचं असेल, तर पुरातत्व खात्याकडून रोखले जाते. नियमांकडे बोट दाखवून स्थगिती दिली जाते. मग, अशी माघारी परवानगी कशी दिली. गडावर काम करण्यासाठी नाहरकतीची गरज असते. तो नियम रोप वे वाल्यांसाठी नाही का?” असंही त्यांनी म्हटलं होतं.